मुंबई, 26 जून : एकेकाळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपला बॉयफ्रेंड असल्याचा दावा करणारी बिग बॉसची स्पर्धक सोफिया हयात (Sofia Hayat) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोफियाने व्हिडिओ शेअर करत रोहित आणि माझ्याबद्दल बोलणं बंद करा, असं आवाहन केलं आहे. 2012 साली रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. मी रोहित शर्माला डेट केलं आहे, पण आता आमच्या दोघांमध्ये सगळं काही संपलं आहे, असा दावा सोफियाने तेव्हा केला होता. 38 वर्षांच्या सोफियाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे. ‘आता आपण हे सोडून देऊ शकतो का? रोहित आणि माझ्याबद्दल बोलणं आता बंद करा. आम्ही एकत्र राहावं, असं अजूनही काहींना वाटतंय, यावर माझा विश्वास नाही. मागच्या काही दिवसांपासून माझं आणि रोहितचं नाव ट्रेण्ड होत आहे. त्याचं आता लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगीही आहे, आपण याचा सन्मान करू शकतो का? त्याच्या लग्नाचा सन्मान करा,’ असं सोफिया या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.
मी रोहितला लंडनच्या हॉटेलमध्ये भेटले होते, तिकडे रोहितने मला किस केलं, असा दावा तेव्हा सोफियाने केला होता. तसंच मी रोहितसोत डान्सही केला, पण मित्रांना त्याने ही माझी फॅन आहे असं सांगितलं, ज्यामुळे मला वेदना झाल्या, असं सोफिया म्हणाली होती. ‘मी रोहितला विसरले आहे. तो आता कसा दिसतो, हेदेखील मला माहिती नाही. आमच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा आम्हाला ट्रेण्ड करायला सुरूवात केली आहे. आमच्या दोघांमध्ये आता सगळं संपलं आहे. आम्ही दोघं आमच्या आयुष्यात सुखी आहोत,’ अशी प्रतिक्रिया सोफियाने या व्हिडिओमध्ये दिली आहे. रोहित शर्मा यावेळी टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये आहे, पण त्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 1 जुलैपासून भारत-इंग्लंड टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार का नाही, याबाबत साशंकता आहे.