रेणुका सिंग
बर्मिंगहॅम, 04 ऑगस्ट**:** हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं बुधवारी रात्री बार्बाडोसचा धुव्वा उडवून राष्ट्रकुल क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताच्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोसला 20 षटकात 62 धावांचीच मजल मारता आली आणि भारतानं हा सामना 100 धावांनी जिंकला. पण या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरनं. रेणुकानं या सामन्यात चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्यात तिनं तिघांच्या यष्ट्या उध्वस्त केल्या. त्यापैकी आलिया एलननच्या विकेटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. रेणुकाचा इनस्विंग सोशल मीडियात हिट रेणुका सिंगनं 5व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आलिया अॅलियनची विकेट काढली. उजव्या स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू अॅलियननं लेफ्ट केला. पण रेणुकाच्या इनस्विंगनं थेट स्टंपचा वेध घेतला. सोशल मीडियात रेणुका सिंगच्या या भन्नाट गोलंदाजीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकच नव्हे तर आयसीसीनंही रेणुकाच्या कालच्या सामन्यातील विकेट्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
बर्मिंगहॅममध्ये रेणुका सुसाट रेणुका सिंगनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या गोलंदाजीनं छाप पाडली आहे. साखळी फेरीअखेर सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत रेणुका सिंग सध्या अव्वल स्थानावर आहे. रेणुकानं आतापर्यंत तीन सामन्यात 48 धावांच्या मोबदल्यात 9 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता रेणुकाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान आणि बार्बाडोसविरुद्ध भारतानं विजय मिळवला. राष्ट्रकुलमध्ये रेणुकाची कामगिरी 4-0-18-4 वि. ऑस्ट्रेलिया 4-1-20-1 वि. पाकिस्तान 4-0-10-4 वि. बार्बाडोस हेही वाचा- टीम इंडियाचं बिझी शेड्यूल… पाहा, कोण कोण येणार भारत दौऱ्यावर? हिमाचल ते टीम इंडिया, रेणुकाचा प्रवास रेणुका सिंग ठाकूर मूळची हिमाचल प्रदेशमधल्या शिमल्याची. रेणुका अवघ्या तीन वर्षांची असताना तिचे वडील वारले. रेणुकाच्या वडिलांना क्रिकेटची फार आवड होती. इतकच नव्हे तर रेणुकाच्या भावाचं विनोद हे नाव त्यांनी क्रिकेटर विनोद कांबळीवरुनच दिलं होतं. वडिलांची हीच क्रिकेटची आवड रेणुकानं जोपासली आणि वयाच्या 14व्या वर्षी ती हिमाचल प्रदेश क्रिकेट अकादमीत दाखल झाली. 2019-20 च्या हंगामात तिनं बीसीसीआयच्या सिनीयर वुमन्स टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आणि जानेवारी 2022 मध्ये ती भारतीय संघात दाखल झाली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेणुकाचे प्रशिक्षक पवन सेन यांनी तिच्या गोलंदाजीचं खास कौतुक केलंय. “इनस्विंग हे तिचं मुख्य अस्त्र आहे. ती इनस्विंग यॉर्कर खूप चांगला टाकते. त्यात ती बेस्ट आहे’’ असं सेन यांनी म्हटलंय. गेली अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका सराव करत आहे. भारताला पदक जिंकण्याची संधी दरम्यान बार्बाडोसवरील विजयानंतर अ गटात भारतानं ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरं स्थान पटकावलं. त्यासोबतच उपांत्य फेरीतला प्रवेशही निश्चित केला. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारताचा सामना ब गटातील न्यूझीलंड किंवा इंग्लंडशी होणार आहे. 1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी भारतीय पुरुष संघाला समाधानकारक कामगिरी बजावता आली नव्हती. पण हरमप्रीत कौरची वुमन ब्रिगेड भारताचं राष्ट्रकुल क्रिकेटमध्ये पदकाचं स्वप्न पूर्ण करण्यापासून अवघं एक पाऊल मागे आहे.