मुंबई, 18 सप्टेंबर : न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानचा तीन वनडे आणि पाच टी-20 मॅचचा दौरा अचानक रद्द (New Zealand Cancelled Pakistan Tour) केला. सुरक्षेचं कारण देत टॉसच्या काही मिनिटं आधी न्यूझीलंडने आपण खेळणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर पाकिस्तानचा मात्र चांगलाच तीळपापड झाला. न्यूझीलंडला असे कोणते सुरक्षेचे इनपुट मिळाले, ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. 18 वर्षानंतर किवी टीम पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. याआधीच्या दौऱ्यातही बॉम्बस्फोट झाल्यामुळे न्यूझीलंडच्या टीमने दौरा अर्धवट सोडला होता. न्यूझीलंडच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानने सीरिज वाचवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन (Jacinda Ardern) यांनाही फोन करत टीमला चोख सुरक्षा देऊ, असं आश्वासन दिलं. जेसिंडा यांनी मात्र आपण टीमच्या निर्णयासोबत आहोत, असं सांगितलं. पहिल्या वनडेच्या टॉसला 20 मिनिटांचा वेळ शिल्लक असताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना हॉटेल रूममध्येच थांबायला सांगितलं. आमच्या सरकारने दिलेल्या सल्ल्यानंतर हा दौरा सुरू ठेवणं शक्य नाही, खेळाडूंची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली.
PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी मात्र या गोंधळावरून पाकिस्तानलाच जबाबदार धरलं आहे. पाकिस्तानमधल्या पंजाब पोलिसांनी 13 सप्टेंबरला एक अलर्ट जाहीर केला होता, यात दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचा इशारा देऊन न्यूझीलंड क्रिकेट दौऱ्यासाठी एक एडव्हायजरी देण्यात आली. म्हणजे पाकिस्ताननेच न्यूझीलंड दौऱ्यावर दहशतवादाचं संकट असल्याचं जगाला सांगितलं.
पंजाब पोलिसांना एवढा गंभीर अलर्ट एवढ्या हलक्यात जाहीर करण्याची गरज नव्हती. जर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेबाबत काही माहिती मिळाली होती, तर ती न्यूझीलंड टीमला दिली गेली पाहिजे होती. पाकिस्तान हे करण्यात अपयशी ठरलं, असं नजम सेठी यांचं म्हणणं आहे.
न्यूझीलंडनंतर आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत, फायदा IPL चा होणार!
पाकिस्तानी मीडिया आणि खेळाडूंनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर (NZC) जोरदार टीका केली आहे. एवढच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) याची तक्रार आयसीसीकडे (ICC) करणार असल्याचं अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी सांगितलं. तर न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केल्याची टीका शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केली.