लाहोर, 23 मार्च : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजची तिसरी मॅच लाहोरमध्ये सुरू आहे. या सामन्यात घडलेल्या एका घटनेमुळे खेळाडूच नाही तर क्रिकेट रसिकही हैराण झाले. पाकिस्तानी फास्ट बॉलर हसन अलीने टाकलेला बॉल स्टम्पला लागला, पण बेल्स पडल्या नाहीत. तरीही अंपायरने बॅटरला आऊट दिलं. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. जेव्हा विकेट कीपर बॅटर ऍलेक्स कॅरी (Alex Carey) बॅटिंग करत होता, तेव्हा हसन अलीने (Hasan Ali) टाकलेला बॉल थेट स्टम्पवर जाऊन लागला, पण बेल्स पडली नाही. तरीही अंपायर अलीम दार (Aleem Dar) यांनी कॅरीला आऊट दिलं. बॉल स्टम्पला लागल्यानंतर विकेट कीपर मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) हातात गेला, यानंतर अंपायरने आऊट दिल्यामुळे कॅरीला धक्का बसला. हसन अलीने टाकलेला बॉल कॅरीच्या पॅड आणि बॅटच्या मधून स्टम्पला लागून विकेट कीपर मोहम्मद रिझवानच्या हातात गेला होता. अंपायर अलीम दार यांना बॉल बॅटला लागला, असं वाटलं त्यामुळे त्यांनी कॅरीला आऊट दिलं. अंपायरच्या या निर्णयानंतर ऍलेक्स कॅरीने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये कॅरी नॉट आऊट असल्याचं समोर आलं. रिप्लेमध्ये मोहम्मद रिझवानकडे बॉल एक टप्पा पडून गेल्याचं स्पष्ट दिसत होतं, तरीही अलीम दार यांनी दिलेल्या या निर्णयावर आता टीका होत आहे. कॅरीने 105 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली. नोमान अलीने कॅरीची विकेट घेतली.
लाहोर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 391 रनवर ऑल आऊट झाला. 206 रनवर ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट गेल्या होत्या, पण कॅमरून ग्रीन आणि एलेक्स कॅरी यांनी शतकीय पार्टनरशीप केली आणि ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढलं. ग्रीनने 79 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 91 रन केले. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि नईम शाह यांना प्रत्येकी 4-4 विकेट मिळाल्या. सीरिजच्या पहिल्या दोन्ही टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या आहेत.