मुंबई, 1 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून ‘ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कोण होणार ?’ या विषयावर चर्चा सुरु आहे. सध्या टीम पेन (Tim Paine) हा टेस्ट टीमचा तर आरोन फिंच (Aaron Finch) हा वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन आहे. स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) देखील पुन्हा एकदा कॅप्टन होण्याची तयारी दाखवली आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर बॉलची छेडछाड केल्याच्या प्रकरणात स्मिथवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्मिथला कॅप्टनसी सोडावी लागली होती. स्मिथची पुन्हा कॅप्टन होण्याची तयारी असली तरी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी मात्र ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बदलण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. या सर्व चर्चेमध्ये आता ऑस्ट्रेलियाला 2015 साली वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन मायकल क्लार्क (Michael Clarke) याने उडी घेतली आहे. क्लार्कनं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनसाठी पॅट कमिन्सचं (Pat Cummins) नाव सुचवलं आहे. कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सदस्य आहे. पॅट कमिन्स हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन म्हणून योग्य उमेदवार आहे, असं मत क्लार्कनं ‘फॉक्स क्रिकेट’ शी बोलताना व्यक्त केले आहे. ‘फक्त कमिन्सच मला कॅप्टन करा आणि मी त्यासाठी योग्य आहे, असं सध्या म्हणत नाही. याचा अर्थ तो चांगला नेता नाही, असा होत नाही,’ असे क्लार्कने स्पष्ट केले. क्लार्कने पुढे सांगितले की, ‘स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, नॅथन लायन या वरिष्ठ खेळाडूंनी कमिन्सला कॅप्टन्सी करण्यात मदत केली पाहिजे.’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये कमिन्स हा ‘न्यू साऊथ वेल्स’ टीमचा कॅप्टन आहे. या टीममध्ये वॉर्नर, स्मिथ, मोईसेस हेन्रिकीस, स्टार्क, जोश हेजलवूड आणि लायन सारखे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळतात. ( वाचा : IPL 2021 : बायो-बबलला घाबरला खेळाडू, अखेरच्या क्षणी घेतली आयपीएलमधून माघार ) मायकल क्लार्कनं कमिन्सच्या बाजूनं मत दिलं असलं तरी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर सध्या टीमचा कॅप्टन बदलण्याच्या मताशी सहमत नाहीत. एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना लँगर म्हणाले होते की ‘आमच्याकडे सध्या दोन चांगले कर्णधार आहेत. भविष्यात आम्हाला ऍशेस आणि टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. आमचं भविष्य उज्ज्वल आहे. माध्यमांमध्ये कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू असली, तरी हे पद सध्या उपलब्ध नाही.’