मुंबई, 09 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्जने अखेरच्या क्षणी मुंबई विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्य रहाणेला संघात घेतलं. त्याने यंदाच्या आयपीएलमधलं वेगवान अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अजिंक्य रहाणेने अवघ्या २७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. सामन्यानंतर बोलताना अजिंक्य रहाणेने मनातली एक इच्छा व्यक्त केली. नाणेफेक झाल्यानंतर आपल्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळायचंय हे समजल्याचं रहाणेने सांगितलं. मोईन अली आजारी पडलाय आणि त्याच्या जागी मी खेळतोय असं मला समजलं. माही भाई आणि फ्लेमिंग यांनी संघात सर्वांनाच स्वातंत्र्य दिलं असल्याचं रहाणे म्हणाला. एकाच गल्लीत MI,CSKचे चाहते, सामन्याआधी पोस्टरबाजी; चेन्नईच्या विजयानंतर धोनीच्या पोस्टरला अभिषेक मुंबई विरुद्ध केलेल्या फटकेबाजीबाबत बोलताना रहाणे म्हणाला की, मी आजच्या खेळाचा आनंद लुटला. केवळ सातत्यपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व लक्ष टायमिंगवर केंद्रीत होतं. वानखेडेवर खेळायचा आनंद नेहमीच लुटलाय. पण इथं एकही कसोटी मी खेळलो नाहीय. मला इथं कसोटी खेळायला आवडेल असं म्हणत रहाणेनं मनातली खंत सांगताना अप्रत्यक्षपणे बीसीसीआय़कडे इच्छाही व्यक्त केलीय. भारताच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणे गेल्या वर्षभरापासून खेळलेला नाही. त्याने आतापर्यंत ८२ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ४ हजार ९३१ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.