स्त्रक्रियेनंतर केएल राहुलची झाली अशी अवस्था, पाहून चाहते हळहळले
मुंबई, 14 मे : सध्या भारतीय क्रिकेट विश्वाला दुखापतीने ग्रहण लागले आहे. जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि आता केएल राहुल यांसारखे स्टार खेळाडू दुखापतीच्या कारणास्थव पुढील काही महिने टीम इंडियातून बाहेर राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वी रिषभ पंत कुबड्यांच्या सहाय्याने चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता आयपीएल दरम्यान दुखापत झालेल्या केएल राहुलचा देखील कुबड्यांच्या सहाय्याने चालतानाचा फोटो व्हायरल होत असून त्याची अशी स्थिती पाहून चाहते हळहळ व्यक्त करीत आहेत. आयपीएल 2023 मधील 43 वा सामना लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध आरसीबी यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुल याला फिल्डिंग करत असताना दुखापत झाली. ही दुखापत काहीशी गंभीर असल्याने राहुलने स्वतः ट्विट करत आपल्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असून आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या बाहेर पडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राहुल लंडन येथे शत्रक्रिया करण्यासाठी रवाना झाला.
केएल राहुलच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळत असून त्याने शस्त्रक्रियेनंतरचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात राहुल कुबड्यांच्या/ वॉकिंग स्टिक्सच्या साहाय्याने चालताना दिसत आहे. तसेच याच दरम्यान त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी देखील पती राहुल सोबत दिसत आहे. केएल राहुलने शेअर केलेल्या फोटोवर त्याचे चाहते आणि क्रिकेटर्सने देखील त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.