गंभीर, नवीनशी झालेल्या भांडणानंतर, विराट कोहलीने सोशल मीडियावरून दिली पहिली प्रतिक्रिया
मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मध्ये झालेल्या 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनऊ सुपर जाएंट्सवर 18 धावांनी विजय मिळवला. परंतु या विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या राड्याचीच चर्चा अधिक झाली. भांडणानंतर आयपीएलने तिघांवरही दंडात्मक कारवाई केली, आता घडलेल्या सर्व प्रकारावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सोमवारी 1 मे रोजी एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडला. आयपीएल 2023 च्या पहिल्या सत्रात आरसीबीच्या होम ग्राउंडवर लखनऊने आरसीबीचा दारुण पराभव करत सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सत्रात काल लखनऊच्या होम ग्राउंडवर पारपडलेल्या सामन्यात आरसीबीने त्यांचा दारुण पराभव केला. या सामन्यादरम्यान एकमेकांबद्दल दाखवलेल्या आक्रमकतेमुळे विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात भांडण झाले. तर यात लखनऊचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरने देखील उडी घेतली आणि या वादात अजून ठिणगी पडली.
सध्या सोशल मीडियावर सामन्यानंतर मैदानावर झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या तिघांनी आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी विराट आणि गंभीरला 100 टक्के नवीनला 50 टक्के मॅच फी दंड म्हणून देण्याची कारवाई करण्यात आली. यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. IPL 2023 RCB vs LSG : विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये पुन्हा राडा, पाहा मॅचनंतर मैदानावर नेमके काय घडलं?
विराटने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याने मार्कस ऑरेलियसचा कोट लिहिला. ज्यामध्ये “आपण जे काही ऐकतो ते मतं असते सत्य नाही, आपण जे काही पाहतो तो दृष्टीकोन आहे, सत्य नाही”. तर विराट कोहलीशी वाद घालणाऱ्या नवीन अल हकने देखील सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया देत लिहिले, ‘तुम्ही ज्यासाठी पात्र आहात तेच तुम्हाला मिळते, ते व्हायला हवे आणि तसेच होत आहे’ सध्या या दोघांनी सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियांची जोरदार चर्चा सुरु आहे.