रोहित शर्माचं हार्दिक पांड्याला प्रत्युत्तर
मुंबई, 24 मे : आयपीएलच्या मागच्या मोसमात गुजरात टायटन्सला विजयी करणाऱ्या कर्णधार हार्दिक पांड्यावर अनेकवेळा अहंकारी असल्याची टीका होते, यामुळे हार्दिक काही वेळा वादातही सापडतो. काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हार्दिकने त्याची आधीची टीम मुंबई इंडियन्सवर निशाणा साधला होता. मुंबईला चॅम्पियन करण्यामध्ये स्टार खेळाडूंचा हात असल्याचं हार्दिक म्हणाला होता. रॉबिन उथप्पासोबत बोलत असताना हार्दिकने मुंबईबद्दल वक्तव्य केलं होतं. या स्पर्धेत यश मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे की तुम्ही सगळ्यात चांगल्या खेळाडूंना विकत घेऊन टीममध्ये आणा, जे मला वाटतं मुंबई इंडियन्सकडे होतं, जेव्हा आम्ही त्या वर्षांमध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, असं हार्दिक म्हणाला. हार्दिकच्या या वक्तव्यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. जिओ सिनेमासोबत रोहित बोलत होता. ही सुपरस्टारची टीम आहे, पण फ्रॅन्चायजीने हिला बनवलं आहे. जेवढ्या खेळाडूंची तुम्ही नावं घेत आहात, त्यांना आम्ही लिलावात विकत घेतलं आहे. मुंबईच्या स्काऊटने हार्दिक आणि कृणालला पाहिलं आणि त्यांना घेऊन आले, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.
आम्ही त्या सगळ्या खेळाडूंवर मेहनत घेतली आहे, हे असंच झालं नाही. 2015 ते 2020 पर्यंत 5 वर्षांचा तो प्रवास होता. जेवढे स्टार खेळाडू मुंबईच्या टीमसोबत होते ते सगळे लिलावात सगळ्यांसाठी उपलब्ध होते. यातले काही खेळाडू आम्हाला ट्रेडमध्ये मिळाले होते. सुपरस्टार टीम आहे, हे म्हणणं सोपं आहे. त्यांना तयार करावं लागतं, याच्यामागे मेहनत घेतली जाते. या गोष्टी बोलणं खूपच सोपं असतं. आम्ही खेळाडूंना निवजतो, घेऊन येतो, त्यांच्यावर मेहनत घेतो, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं आहे.