Photo- IPL/Twitter
मुंबई, 12 मे : सूर्यकुमार यादवचं वादळी शतक आणि भेदक बॉलिंगच्या जोरावर मुंबईने गुजरातचा 27 रनने पराभव केला आहे. मुंबईने दिलेल्या 219 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 20 ओव्हरमध्ये 191/8 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातने 55 रनवरच 5 विकेट गमावल्या होत्या, पण राशिद खानने झुंजार खेळी केली. राशिद खानने 32 बॉलमध्ये 79 रन केले, यामध्ये 10 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. या इनिंगमध्ये राशिदचा स्ट्राईक रेट 246.88 एवढा होता. डेविड मिलरनेही 26 बॉलमध्ये 41 आणि विजय शंकरने 14 बॉलमध्ये 29 रन केले. मुंबईकडून आकाश मढवालने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. जेसन बेहरनडॉर्फला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 218 रन केल्या. सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये 210 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 103 रनची खेळी केली. सूर्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. रोहित आणि इशान यांनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये 61 रन केले, रोहित 31 रनवर तर इशान 29 रन करून आऊट झाला. विष्णू विनोदने 30 आणि नेहल वढेराने 15 रन केले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मोहित शर्माला 1 विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच मुंबईच्या खात्यात 14 पॉईंट्स जमा झाले आहेत. मुंबईने या मोसमात 12 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या उरलेल्या दोन मॅच लखनऊ आणि हैदराबादविरुद्ध आहेत.