सनरायजर्सचा कर्णधार झाला सुपरमॅन, सूर्याचा कॅच पकडण्यासाठी घेतली अशी झेप, Video
मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 25 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळावला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची विकेट घेण्यासाठी सनरायजर्सच्या कर्णधाराने सुपरमॅन स्टाईल झेप घेतली. या सुपर कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना सुरु असून या सामन्यात प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये ५ विकेट्स घालवून 192 धावा केल्या आहेत. या सामन्यात मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 28, ईशान किशनने 38, कॅमेरून ग्रीनने 64, सूर्यकुमार यादवने 7, तिलक वर्माने 37 आणि टीम डेव्हिडने 16 धावा केल्या. तर हैद्राबादकडून मॅक्रो जॅनसेनने 2 तर भुवनेश्वर आणि नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सच्या दोन विकेट गेल्यावर सूर्यकुमार यादव मैदानात आला, आणि सूर्याने मैदानावर जबरदस्त षटकार ठोकला. परंतु यानंतर हैद्राबादच्या फलंदाजांनी त्याला अधिककाळ मैदानावर तग धरून दिला नाही. 12 वी ओव्हर सुरु असताना मॅक्रो जॅनसेनने टाकलेल्या बॉलवर सूर्याने जोरदार शॉट मारला परंतु कर्णधार एडन मार्करमने सुपरमॅनप्रमाणे झेप घेत सूर्याची कॅच पकडली. मार्करमने घेतलेल्या कमाल कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.