सूर्यकुमारचा आवडत्या शॉटनेच केला घात, लखनौच्या बॉलरने उडवले स्टंप्स
मुंबई, 16 मे : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला. मागील दोन सामन्यात मुंबईच्या संघाला आपल्या जबरदस्त फलंदाजीने तारणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. सुपला शॉटसाठी फेमस असणारा सूर्या त्याचा आवडता शॉट मारतानाच बाद झाला. लखनौमधील एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. यात प्रथम फलंदाजी केलेल्या लखनौ सुपर जाएंट्सने 20 ओव्हरमध्ये 177 धावा करून मुंबई इंडियन्सला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी मुंबईचे फलंदाज विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले. फलंदाजीत मुंबईची सुरुवात काहीशी चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने 37 तर ईशान किशनने 59 धावा केल्या. परंतु या दोघांची विकेट पडल्यावर मुंबईचा डाव ढेपाळला. मागील दोन्ही सामन्यात मुंबईचा तारणहार ठरलेला सूर्यकुमार यादव या सामन्यातही संघासाठी चांगली कामगिरी करेल अशी आशा होती.
सूर्याने गुजरात विरुद्धच्या सामन्यात होम ग्राउंडवर आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले होते. परंतु या सामन्यात सूर्या मात्र अवघ्या 7 धावा करून बाद झाला आणि याला कारण ठरला त्याचा सुपला शॉट. सूर्यकुमार हा क्रिकेटमध्ये त्याच्या सुपला शॉटसाठी प्रसिद्ध आहे. परंतु लखनौ विरुद्धच्या सामन्यात याच शॉटने त्याचा घात केला. लखनौचा गोलंदाज यश ठाकूरने सूर्याला 14 व्या ओव्हरमधील पहिलाच बॉल टाकला. यावेळी सूर्या सुपला शॉट मारण्याच्या प्रयत्नात असताना यशने टाकलेल्या बॉलने त्याचे स्टंप्स उडवले आणि सूर्या थेट मैदानावर कोसळला.