भावा लवकर बरा हो! क्रिकेट स्टार्सने घेतली रिषभ पंतची भेट
मुंबई, 26 मार्च : आयपीएल 2023 ला लवकरच सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्रिकेटच्या मैदानावरील रोमांच अनुभवायला मिळणार असून सहभागी होणाऱ्या संघानी यास्पर्धेसाठी सरावाला सुरुवात केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत हा दुखापतग्रस्त असल्याने खेळताना दिसणार नाही. तेव्हा आयपीएल सुरु होण्यापूर्वी भारताच्या काही माजी क्रिकेटर्सनी त्याची भेट घेतली. रिषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. यात रिषभ देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात रिषभच्या पायावर दोनदा शस्त्रक्रीया करण्यात आली. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी तो यंदा आयपीएल मध्ये खेळताना दिसणार नाही. तेव्हा आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असताना भारताच्या स्टार क्रिकेटर्सनी रिषभच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी भेट दिली.
भारताचे माजी क्रिकेटर हरभजन सिंह, सुरेश रैना, श्रीसंत इत्यादींनी रिषभची भेट घेतली. सुरेश रैनाने या भेटी दरम्यानचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोखाली रैनाने लिहिले, “कुटुंब हेच आपले हृदय आहे. आमचा भाऊ रिषभ पंत लवकर बरा होवो हीच प्रार्थना आणि शुभेच्छा!” या फोटोवर रिषभच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.