मुंबई, 27 एप्रिल : आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शांत आहे. 9 मॅचमध्ये 16 च्या सरासरीने त्याने फक्त 128 रन केल्या आहेत. विराटचा हा खराब फॉर्म बघून टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटला आयपीएल सोडून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. विराट बऱ्याच काळापासून लागोपाठ क्रिकेट खेळत आहे, तसंच तो कॅप्टन्सीही करत होता, असं शास्त्री म्हणाले. विराट आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे, त्याच्या नावावर 5 शतकं आणि 42 अर्धशतकं आहेत, पण या मोसमात तो करियरमधल्या सगळ्यात खराब काळातून जात आहे. विराटने मागची आयपीएल संपल्यानंतर आरसीबीची कॅप्टन्सीही सोडली, त्यामुळे आता तो फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात खेळत आहे. जतिन सप्रूच्या युट्युब चॅनलवर रवी शास्त्री विराटबद्दल बोलत होते. ‘मला वाटतं त्याच्यासाठी ब्रेक घेणं योग्य आहे, कारण तो नॉन स्टॉप क्रिकेट खेळत आहे, त्याने सगळ्या फॉरमॅटमध्ये टीमचं नेतृत्व केलं आहे, त्याच्यासाठी विश्रांती घेणं डोक्याचं ठरेल. कधी कधी संतुलन ठेवावं लागतं, पुढची 6-7 वर्ष छाप पाडायची असेल, तर आयपीएलमधून बाहेर हो,’ अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली. ‘मी फक्त विराटच नाही तर संघर्ष करणाऱ्या इतर खेळाडूंनाही हाच सल्ला देईन. तुम्ही लागोपाठ 14-15 वर्ष खेळत आहात. जर जास्त काळ खेळायचं असेल आणि देशासाठी चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल. हा ब्रेक जेव्हा भारत खेळत नसेल तेव्हाच घेणं आदर्श असेल,’ असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं. ‘भारत फक्त आयपीएल खेळत नाही, मी फक्त अर्धा मोसम खेळेन, त्यामुळे मला अर्धेच मानधन द्या, असं फ्रॅन्चायजींना सांगणं कधी कधी गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून शीर्ष स्थानावर पोहोचायचं असेल, तर असे कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे,’ असं शास्त्री म्हणाले.