मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबाद (SRH) पुढच्या मॅच त्यांचा नियमित कर्णधार केन विलियमसनशिवाय (Kane Williamson) खेळणार आहे. केन विलियमसन दुसऱ्यांदा बाबा होत असल्यामुळे तो न्यूझीलंडला परतला आहे. सनरायजर्स हैदराबादने याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली. मंगळवारी हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians vs SRH) विजय मिळवला होता. आता त्यांचा पुढचा सामना 22 मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. या मोसमातला लीग स्टेजमधला हा त्यांचा शेवटचा सामना असेल. ‘आमचा कर्णधार केन विलियमसन त्याच्या कुटुंबात नवा सदस्य येत असल्यामुळे न्यूझीलंडला जात आहे. विलियमसनच्या पत्नीची सुरक्षित डिलिव्हरी आणि त्यांच्या आनंदासाठी सनरायजर्स परिवार प्रार्थना करत आहे,’ असं ट्वीट सनरायजर्स हैदराबादने केलं आहे.
प्ले-ऑफचा मार्ग कठीण 17 मे रोजी हैदराबादने मुंबईचा 3 रनने पराभव केला, यानंतर त्यांचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं आव्हान आजही कायम आहे, पण हा मार्ग अत्यंत कठीण आहे. कारण टीमचा नेट रन रेट इतर टीमपेक्षा खूप मागे आहे. पंजाब किंग्सविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला तरीही त्यांचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास अशक्य आहे. विलियमसनच्या नेतृत्वात हैदराबादने 13 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. 12 पॉईंट्ससह हैदराबाद 8व्या क्रमांकावर आहे. विलियमसन फ्लॉप आयपीएल 2022 मध्ये केन विलियमसनची बॅट शांत राहिली. 13 सामन्यांमध्ये त्याने फक्त 216 रन केले, यात त्याला एक अर्धशतक करता आलं. विलियमसनच्या या खराब कामगिरीचा फटका टीमलाही बसला.