मुंबई, 8 मार्च : आयपीएल 2022 च्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधीच सुरेश रैनाची (Suresh Raina) आयपीएल खेळण्याची अखेरची आशाही मावळली आहे. आयपीएलच्या या मोसमासाठी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) इंग्लंडच्या जेसन रॉयऐवजी (Jason Roy) अफगाणिस्तानचा आक्रमक ओपनर रहमामुल्लाह गुरबाज (Gurbaz) याला टीममध्ये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जेसन रॉयला गुजरात टायटन्सने लिलावात विकत घेतलं होतं, पण त्याने अखेरच्या क्षणी आपलं नाव मागे घेतलं. एवढा काळ बायो-बबलमध्ये राहता येणं शक्य नसल्याचं कारण रॉयने दिलं. टी-20 मध्ये गुरबाजचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 69 टी-20 मध्ये त्याने 113 सिक्स लगावल्या आहेत. गुजरातची टीम गुरबाजला टीममध्ये घेण्यासाठी बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे. गुजरात टीममधलाच अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान याचाही सल्ला घेण्यात आला आहे. गुरबाज विकेट कीपर म्हणून खेळणार गुरबाजच्या येण्याने गुजरातची विकेट कीपरच्या समस्येवरही तोडगा निघेल. मॅथ्यू वेड आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे, त्यामुळे सध्या टीमकडे ऋद्धीमान साहा हा एकमेव विकेट कीपर आहे. साहाचं टी-20 मधलं रेकॉर्डही निराशाजनक आहे. गुरबाज पीएसएलमध्ये मुलतान सुलतान्स आणि इस्लामाबाद युनायटेडकडून, लंका प्रीमियर लीगमध्ये कॅन्डी टस्कर्सकडून आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्सकडून खेळला आहे. रैनाला धक्का जेसन रॉयने जेव्हा आयपीएलमधून माघार घेतली तेव्हा गुजरातची टीम रैनाला संधी देईल असं बोललं जात होतं. सोशल मीडियावरही गुजरातने रैनाला संधी द्यावी अशी मोहीम सुरू होती. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजारत टायटन्सने रैनावर विश्वास दाखवला नाही. मिस्टर आयपीएल अशी ओळख मिळालेल्या रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 रन केले, तसंच त्याच्या नावावर 39 अर्धशतकं आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) यशामध्येही रैनाची भूमिका महत्त्वाची राहिली, पण यंदा सीएसकेने त्याच्यावर बोली लावली नाही, यावरूनही सीएसकेवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली.