Kuldeep Yadav
नवी दिल्ली, 21 डिसेंबर: भारतीय गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पुढील वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी (IPL2022) पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आयपीएल 2022 ची तयारीला सुरुवात केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर आहे आणि यामुळे त्याला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाच्या मध्यातून बाहेर राहावे लागले. सप्टेंबरमध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर कुलदीप यादव लवकरात लवकर मैदानात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी रणजी सीजनमध्ये भाग घेण्यासाठी चायन मॅन कुलदीप यादवने लवकरात लवकर तंदुरुस्त होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याने नेट्समध्ये प्रॅक्टीस करतेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुलदीप मैदानापासून लांब आहे. आयपीएलच्या मागील 2 हंगामात तो केवळ 9 आणि 5 सामने खेळला आहे. एकूण, त्याने 45 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 8.27 च्या इकॉनॉमीने 40 बळी घेतले आहेत. त्याला शेवटचे 5.8 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होते, परंतु काही काळ मैदानाबाहेर असल्यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याची किंमत कमी होऊ शकते.
आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करणार्या दोन नवीन फ्रँचायझी अहमदाबाद आणि लखनौ येथील अनुभवी गोलंदाज विकत घेण्याची शक्यता आहे, परंतु उर्वरित फ्रँचायझी देखील त्यांच्यावर बोली लावू शकतात. कुलदीप काही आठवड्यांपूर्वी एनसीएमध्ये पुनर्वसनासाठी आला होता आणि तेव्हापासून तो सतत चाहत्यांना फोटो आणि व्हिडिओंद्वारे अपडेट देताना दिसत आहे.