मुंबई, 12 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला (Mumbai Indians vs CSK) प्ले-ऑफच्या (IPL Play Offs) रेसमधून बाहेर काढलं आहे. चेन्नईने दिलेलं 98 रनचं आव्हान पार करताना मुंबईच्या नाकी नऊ आले होते, पण तिलक वर्माने (Tilak Varma) एका बाजूने खिंड लढवली. सीएसकेने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईची अवस्था 33/4 अशी झाली होती, पण तिलक वर्माने 32 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली. याशिवाय ऋतीक शौकीन आणि रोहित शर्माने प्रत्येकी 18-18 आणि टीम डेव्हिडने 7 बॉलमध्ये नाबाद 16 रन केले. सीएसकेकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सिमरजीत सिंग आणि मोईन अली यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी चेन्नईला 16 ओव्हरमध्ये 97 रनवर ऑल आऊट केलं. डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) पहिल्याच ओव्हरमध्ये चेन्नईला दोन धक्के दिले, यानंतर बुमराहने (Jasprit Bumrah) दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेतली, त्यामुळे चेन्नईची अवस्था 5/3 अशी झाली होती. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर रिले मेरेडिथआणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंग यांनी 1-1 विकेट मिळवली. चेन्नईकडून एमएस धोनीने (MS Dhoni) 33 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले. मुंबईविरुद्धच्या या पराभवासोबतच चेन्नई प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झालेली दुसरी टीम आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली होती. मुंबईने या मोसमात 12 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 9 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर सीएसकेने 12 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 8 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.