JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : आयपीएलमधून BCCI आणि टीमची कमाई कशी होते? जाणून घ्या गणित

IPL 2022 : आयपीएलमधून BCCI आणि टीमची कमाई कशी होते? जाणून घ्या गणित

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2022चा (IPL 2022) रणसंग्राम आता सुरू झाला आहे. दर वर्षीप्रमाणेच यंदादेखील आयपीएल वैशिष्ट्यपूर्ण आहे. आयपीएल आणि आर्थिक उलाढाल (Financial turnover) यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2022चा (IPL 2022) रणसंग्राम आता सुरू झाला आहे. दर वर्षीप्रमाणेच यंदादेखील आयपीएल वैशिष्ट्यपूर्ण आहे. आयपीएल आणि आर्थिक उलाढाल (Financial turnover) यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आयपीएलमधून होणारी कमाई हा खरं तर सर्वसामान्य क्रीडा रसिकांसाठी चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. आयपीएलचं अर्थकारण नेमकं कसं आहे, असा प्रश्न प्रेक्षक आणि क्रिकेटच्या (Cricket) चाहत्यांना नेहमीच पडतो. खरं तर, फोर आणि सिक्सच्या पावसाबरोबरच आयपीएल ही बीसीसीआय (BCCI), तसंच टीमचे मालक (Team Owner) आणि खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणारी स्पर्धा आहे. 2008 मधल्या पहिल्या सीझनपासून आयपीएलची लोकप्रियता आणि कमाई या दोन्हींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आयपीएल ही एक टी-20 क्रिकेट लीग असून, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय तिचं आयोजन करते. 2008 मध्ये 8 टीम्सच्या सहभागातून आयपीएलला सुरुवात झाली. नंतरच्या काळात यात कोची टस्कर्स केरळ आणि सहारा पुणे वॉरियर्स या टीम सहभागी झाल्या; मात्र काही कारणाने त्या लीगमधून बाहेर पडल्या. 2016-17 मध्ये राजस्थान आणि चेन्नई टीमवर 2 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. दरम्यानच्या काळात गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या टीम ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाल्या. यंदा लखनऊ आणि अहमदाबाद या दोन टीम्स नव्याने ‘आयपीएल’मध्ये समाविष्ट झाल्याने आता टीम्सची संख्या दहावर पोहोचली आहे. खरं तर ‘आयपीएल’चा संपूर्ण खेळ हा एक व्यवसाय (Business) आहे. यातल्या प्रत्येक भागामधून बीसीसीआय आणि टीमच्या मालकांना प्रचंड महसूल (Revenue) मिळतो. आयपीएलमधली कमाई तीन भागांत विभागली जाते. यात प्रामुख्याने जाहिरात आणि प्रमोशन (Advertising and promotion), सेंट्रल (Central) आणि लोकल महसुलाचा (Local Revenue) समावेश असतो. - जाहिरात आणि प्रमोशन टीम्सना जाहिरात आणि प्रमोशन्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईचा वाटा सुमारे 20 ते 30 टक्के असतो. यातून उत्पन्न मिळवण्यासाठी टीम्सचं स्वतःचं बिझनेस मॉडेल असतं. या मॉडेलअंतर्गत टीम्स अनेक कंपन्यांशी करार करतात. - टीमच्या जाहिराती आणि प्रमोशनअंतर्गत कंपन्या क्रिकेटर्स आणि अंपायरच्या जर्सी, हेल्मेट, विकेट, ग्राउंड आणि सीमारेषेवर दिसणाऱ्या कंपन्यांची नावं आणि लोगो इत्यादींसाठी टीम्सना पैसे देतात. त्याचप्रमाणे टीम क्रिकेटरकडून दुसऱ्या ब्रँडच्या (Brand) जाहिराती करून घेतात. काही टीम्स खेळाडूंकडून स्वतःच्या ब्रँडचं प्रमोशन करून घेतात. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्स जिओची जाहिरात करतात. त्यात रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू दिसतात. - टीम त्यांची नावं आणि लोगो असलेले टी-शर्ट, कॅप्स, ग्लोब्स इत्यादी वस्तू विकून पैसे कमावतात. मुंबई इंडियन्ससारखी टीम जाहिराती आणि ब्रॅंड प्रमोशनच्या माध्यमातून दर वर्षी 50 कोटी रुपये कमावते. लोकल रेव्हेन्यू ग्राउंडवर विक्री होणारी तिकिटं (Tickets) हा आयपीएल टीम्सचा उत्पन्नाचा आणखी एक मार्ग असतो. एकूण उत्पन्नापैकी सुमारे 10 टक्के उत्पन्न यातून मिळतं. एका मॅचवेळी विकल्या गेलेल्या तिकिटांवर 4 ते 5 कोटी रुपयांपर्यंत कमाई होते. यातली 80 टक्के रक्कम स्थानिक टीमला मिळते. म्हणजेच प्रत्येक मॅचमधून टीम्सना तिकीट विक्रीच्या माध्यमातून 3 ते 4 कोटी रुपये मिळतात. कोरोना काळात या कमाईत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. सेंट्रल रेव्हेन्यू आयपीएल टीम्सचा उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे सेंट्रल रेव्हेन्यू. हे उत्पन्न ‘आयपीएल’च्या एकूण कमाईच्या सुमारे 60 ते 70 टक्के आहे. सेंट्रल रेव्हेन्यूचे माध्यम किंवा प्रसारण हक्क (Media or broadcast rights) आणि टायटल स्पॉन्सरशिप (Title Sponsorship) हे दोन महत्त्वाचे स्रोत आहेत. यात माध्यम प्रसारणाचा हक्क म्हणजे ज्या चॅनेलला हक्क दिले आहेत तेच चॅनेल आयपीएल मॅचेसचं प्रसारण करू शकतं. ‘आयपीएल’च्या सुरुवातीला 2008 पासून ते 2017 पर्यंत म्हणजे एकूण दहा वर्षं प्रसारणाचे हक्क सोनी चॅनेलकडे (Sony) होते. यासाठी या चॅनेलने ‘बीसीसीआय’ला 8200 कोटी दिले होते. 2018 मध्ये प्रसारणाच्या हक्कासाठी पुन्हा बोली लावण्यात आली आणि त्या वेळी स्टार स्पोर्ट्स (Star Sports) चॅनेलने बाजी मारली. स्टारने 2018 ते 2022 या वर्षांसाठी 16,347 कोटी रुपयांना आयपीएल प्रसारणाचे हक्क विकत घेतले. माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते, 2023 ते 2028 साठी आयपीएल प्रसारणाचे हक्क 30 हजार कोटींना विकले जाऊ शकतात. सुरुवातीच्या काळात प्रसारणाच्या हक्कातून मिळणारं 20 टक्के उत्पन्न हे बीसीसीआयला तर 80 टक्के उत्पन्न टीम्सना मिळत होतं; पण हळूहळू हे प्रमाण 50-50 टक्के असं झालं. आयपीएलच्या पहिल्या दहा सीझनमध्ये प्रसारण हक्कातून बीसीसीआय आणि टीम्सना 8200 कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम प्रतिवर्ष 820 कोटी होती. 2018 मध्ये स्टार स्पोर्ट्सने 5 वर्षांसाठी नव्याने प्रसारण हक्क 16.347 रुपयांना खरेदी केले. ही रक्कम प्रति वर्ष 3270 कोटी रुपये होते. सेंट्रल रेव्हेन्यूचं दुसरं माध्यम टायटल स्पॉन्सरशिप होय. टायटल स्पॉन्सरशिप म्हणजे आयपीएल नावाआधी एखाद्या फर्मचं नाव लावणं होय. उदाहरणार्थ, डीएलएफ आयपीएल, पेप्सी आयपीएल, विवो आयपीएल. ब्रँडस् आयपीएलच्या नावापूर्वी आपलं नाव लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. कारण यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होते. देशातल्या सर्वांत मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या ‘डीएलएफ’ने (DLF) आयपीएलच्या 2008 ते 2012 या पाच सीझनसाठी 200 कोटी रुपयांना टायटल स्पॉन्सरशिप हक्क विकत घेतले. त्यानंतर पुढील पाच सीझनसाठी पेप्सीने या हक्कांसाठी 397 कोटी रुपये खर्च केले; पण करार पूर्ण होण्यापूर्वी दोन वर्ष आधीच म्हणजे 2015 मध्ये पेप्सी यातून बाजूला झाली. त्यानंतर बीसीसीआयने 2016 आणि 2017 या दोन सीझनसाठी चिनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या विवोला (Vivo) हे हक्क 200 कोटींना विकले. त्यानंतर विवोने पुन्हा 2018 ते 2022 या पाच सीझनसाठी हे हक्क 2199 कोटींना खरेदी केले. भारत आणि चीन वादामुळे 2020 मध्ये ड्रीम 11 टायटल स्पॉन्सर बनला आणि यासाठी त्यांनी 222 कोटी दिले. त्यानंतर 2021 मध्ये विवोने पुनरागमन करून 439.8 कोटींना टायटल स्पॉन्सरशिप खरेदी केली. 2022 मध्ये दोन सीझनसाठी टाटाने (Tata) टायटल स्पॉन्सरशिप मिळवली असून, ्यासाठी या कंपनीने 600 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय प्राइझ मनी (Prize Money) म्हणजे बक्षिसाची रक्कम हादेखील टॉप 4 टीम्सच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतो. 2021 मध्ये विजेत्या टीमला 20 कोटी रुपये, रनर अपला 12.5 कोटी रुपये मिळाले होते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या टीमला अनुक्रमे प्रत्येकी 8.75 कोटी रुपये मिळाले होते. प्राइझ मनीचा निम्मा वाटा टीमच्या मालकाला मिळतो. उर्वरित अर्धा वाटा टीममध्ये वाटला जातो. या सर्वांत प्राइज मनीचा समावेश केला तर आयपीएलच्या टॉप-4 टीम्सना वर्षाला 140 ते 150 कोटींचा फायदा होतो. टीम्सच्या सेंट्रल, जाहिरात आणि लोकल उत्पन्नाची बेरीज केली तर गेल्या काही वर्षात आयपीएलच्या प्रत्येक संघाने वार्षिक सुमारे 300 कोटी रुपये कमावले आहेत. यातला मोठा वाटा त्यांना अन्य गोष्टींसाठी खर्चदेखील करावा लागला आहे. आयपीएल टीम्स यापैकी दर वर्षी सुमारे 90 कोटी रुपये खेळाडूंच्या मानधनावर खर्च करतं. त्याचप्रमाणे दर वर्षी 35 ते 40 कोटी रुपये ऑपरेशन कॉस्टवर (Operation Cost) खर्च करते. यात खेळाडूंचा विमानप्रवास आणि हॉटेलमधल्या राहण्याचा खर्च समाविष्ट असतो. या दोन्ही गोष्टींवर टीम्सचा दर वर्षी एकूण 130 ते 140 कोटी रुपये खर्च होतो. तसंच प्रत्येक मॅचच्या आयोजनासाठी टीम्सना स्टेट असोसिएशनला 50 लाख रुपये द्यावे लागतात. प्रत्येक सीझनमधल्या 7 मॅचेसकरिता 3.50 कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय टीम्सना आपल्या एकूण उत्पन्नातला 20 टक्के वाटा बीसीसीआयला द्यावा लागतो. टीम्सच्या उत्पन्नाचा हिशोब करता ही रक्कम 25 ते 30 कोटी रुपये होते. आता आपण आयपीएल टीम्सचा दर वर्षी सुमारे 300 कोटी म्हणजेच सुमारे 160 ते 165 कोटींचा खर्च बाजूला काढला, तर या टीम्सना वर्षाला सुमारे 130 ते 140 कोटींचा नफा (Profit) होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या