नवी मुंबई, 16 मे : शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) उत्कृष्ट बॉलिंगमुळे दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) 17 रननी पराभव केला आहे. दिल्लीने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 142 रन करता आले. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये 36 रन देऊन 4 विकेट घेतल्या. आयपीएलमधली (IPL) शार्दुलची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शार्दुलशिवाय अक्षर पटेल-कुलदीप यादवला 2-2 आणि एनरिच नॉर्कियाला 1 विकेट मिळाली. पंजाबकडून जितेश शर्माने सर्वाधिक 44 रन केले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 159/7 एवढा स्कोअर केला. मिचेल मार्शने 63, सरफराज खानने 32 आणि ललित यादवने 24 रनची खेळी केली. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीपला 3-3 विकेट मिळाल्या, तर रबाडाला एक विकेट घेण्यात यश आलं. या विजयामुळे दिल्लीच्या प्ले-ऑफला (IPL Play Off) पोहोचण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पंजाबसोबतच आरसीबीच्या (RCB) प्ले-ऑफच्या मार्गातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आरसीबीनेही दिल्ली एवढ्याच मॅच जिंकल्या आहेत, पण दिल्लीचा नेट रनरेट प्लसमध्ये आणि आरसीबीचा मायनसमध्ये आहे.