Photo-Bhuvneshwar Kumar/Twitter
मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे यंदाही प्रत्येक टीम बायो-बबलमध्ये आहेत. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बायो-बबलमध्ये असल्यामुळे जवळपास प्रत्येक खेळाडू कुटुंबासह आयपीएल खेळायला आले आहेत. कुटुंबासोबत असल्यामुळे खेळाडू सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करत असतात. टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यानेही त्याच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भुवीने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्याची मुलगी इंटरनेट सेनसेशन झाली आहे. भुवीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूरने 24 नोव्हेंबर 2021 ला दिल्लीच्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला. 23 नोव्हेंबर 2017 ला भुवनेश्वर आणि नुपूर यांचं उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये लग्न झालं. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भुवी आणि नुपूर यांच्या आयुष्यात गोड परीचं आगमन झालं. आयपीएलच्या या मोसमातही भुवनेश्वर कुमार सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. आयपीएल लिलावामध्ये भुवनेश्वर कुमारला हैदराबादने 4.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. भुवीने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 132 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या मोसमात हैदराबाद त्यांचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळणार आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर मंगळवारी ही मॅच होणार आहे.