भारताने सलग तिसरी वनडे सामना जिंकून मालिका खिश्यात घातली आहे. भारताने तिसऱ्या वनडेमध्ये तब्बल 119 रन्सने विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली, 28 जुलै : शुभमन गिलची धडाकेबाज खेळी आणि युजेंद्र चहलच्या अचूक माऱ्यापुढे आपल्याच मायभूमीमध्ये वेस्ट इंडीजने नांग्या टाकल्यात. भारताने सलग तिसरी वनडे सामना जिंकून मालिका खिश्यात घातली आहे. भारताने तिसऱ्या वनडेमध्ये तब्बल 119 रन्सने विजय मिळवला आहे. भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटिंग केली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सामना 40 ओव्हर्सचा करण्यात आला होता. पण 36 ओव्हर झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळी इथेच थांबवण्यात आली. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला 35 ओव्हरमध्ये 225 धावांचे टार्गेट देण्यात आले होते. पण वेस्ट इंडीज टीम अवघ्या 137 रन्सवर गारद झाला. शुभमन गिलने धडाकेबाज खेळी करत 98 रन्स केले. अवघ्या 2 रनमुळे गिलचे शतक हुकले. तर युजेंद्र चहलने 4 विकेट घेऊन विंडीजच्या गडाला भगदाड पाडले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाला एक-एक विकेट मिळाली. शुभमन गिलने 98 बॉल्समध्ये 2 सिक्स आणि 7 चौकार लगावून नाबाद 98 रन्सची खेळी केली. तर कर्णधार शिखर धवन 58 रन्स करून आऊट झाला.. तर श्रेयस अय्यरने गिलला साथ देत 44 रन्स केले. त्यामुळेच मॅन ऑफ द मच आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी निवड झाली. आणखी दोन ओव्हरर्स खेळण्यास मिळाल्या असत्या तर गिलने शतकाला गवसणी घातली असती. विंडीज विरोधात सलग तिसरी मॅच जिंकून भारताने आपला कट्टर शत्रू पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडीत काढला आहे. पाकिस्तानने झिम्बाब्वेविरोधात सलग 11 वनडे सीरीज जिंकल्या होत्या. आता भारताने पाकला मागे टाकले आहे. भारताने 2007 पासून आतापर्यंत विंडीजविरोधात 12 वेळा वनडे सीरीजमध्ये विजय मिळवला आहे. आता एखाद्या टीमविरोधात सर्वाधिक विजय मिळवण्याचा रेकॉर्ड हा भारताच्या नावावर आहे.