बँगलोर, 14 मार्च : भारताने टी-20 सीरिजनंतर आता टेस्ट सीरिजमध्येही श्रीलंकेला (India vs Sri Lanka) व्हाईटवॉश केलं आहे. बँगलोरमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी 238 रननी दणदणीत विजय झाला. भारताने दिलेल्या 447 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची दुसरी इनिंग 208 रनवरच संपुष्टात आली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रेयस अय्यरने दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकं केली, तर बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. घरच्या मैदानात बुमराहला पहिल्यांदाच इनिंगमध्ये 5 विकेट मिळाल्या. या दोघांशिवाय आणखी तीन खेळाडूंनी भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. श्रेयसचा फॉर्म कायम श्रेयस अय्यरने बँगलोरच्या कठीण खेळपट्टीवर पहिल्या इनिंगमध्ये 92 रनची खेळी केली, त्यामुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये 252 रनपर्यंत मजल मारली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये तो 67 रन करून आऊट झाला. या अर्धशतकामुळे भारताने श्रीलंकेला विजयासाठी 447 रनचं अशक्य आव्हान दिलं. दोन्ही इनिंगमध्ये तो भारताचा टॉप स्कोरर राहिला. पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या या फॉर्ममुळे आता अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) टीम इंडियात पुनरागमन करणं कठीण झालं आहे. बुमराहचा पंच बँगलोरच्या स्पिन बॉलरना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर बुमराहने कहर केला. 10 ओव्हरमध्ये 24 रन देऊन त्याने 5 विकेट मिळवल्या. पिंक बॉल टेस्टमध्ये बुमराहला पहिल्यांदाच 5 विकेट मिळाल्या. बुमराहच्या या कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेला पहिल्या इनिंगमध्ये 109 रनवर ऑलआऊट केलं, ज्यामुळे टीमला 143 रनची आघाडी मिळाली. याशिवाय दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 3 अशा मॅचमध्ये एकूण 8 विकेट घेतल्या. ऋषभ पंतची आक्रमक बॅटिंग ऋषभ पंतने (Rishabh Pant) या सामन्यात आक्रमक बॅटिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये 26 बॉलमध्ये 39 रन करून पंत आऊट झाला. यानंतर पंतने दुसऱ्या इनिंगमध्ये 28 बॉलमध्येच अर्धशतक झळकावलं. याचसोबत तो टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय बॅटरही बनला. पंतच्या या वादळी खेळीमुळे भारताने श्रीलंकेला मोठं आव्हान दिलं. अश्विनच्या फिरकीमध्ये अडकली श्रीलंका आर.अश्विननेही (R Ashwin) भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. पहिल्या इनिंगमध्ये 13 रन करण्यासोबत त्याने 2 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 4 विकेट मिळवल्या. विहारी संकटमोचक हनुमा विहारीला (Hanuma Vihari) बँगलोर टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक करता आलं नाही, पण कठीण खेळपट्टीवर त्याने 31 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 35 रन केले. दोन्ही इनिंगमध्ये विहारीने महत्त्वाची पार्टनरशीप केली. रोहित आणि मयंक हे ओपनर लवकर आऊट झाल्यानंतर विहारीने विराटसोबत 47 रन केले, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने रोहितसोबत 56 रनची पार्टनरशीप केली. याचसह त्याने भारताची पडझडही रोखली. तिसऱ्या क्रमांकावर हनुमा विहारीने चिकाटी दाखवल्यामुळे आता चेतेश्वर पुजाराचंही (Cheteshwar Pujara) टीममध्ये परत येणं अवघड झालं आहे.