मुंबई, 29 एप्रिल : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. रोहितला टेस्ट टीमचा कॅप्टन करतानाच त्याच्यावर उत्तराधिकारी तयार करण्याची जबाबदारीही निवड समितीनं सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. बीसीसीआयनं टेस्ट टीमच्या व्हाईस कॅप्टनपदी ऋषभ पंतची (Rishabh Pant) नियुक्ती करावी. तसंच त्याला भावी कॅप्टन म्हणून तयार करावं’ अशी मागणी टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) केली आहे. युवराज सिंहनं ‘स्पोर्ट्स 18’ (Sports 18) या नव्या क्रीडा वाहिनीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंतला भावी कॅप्टन म्हणून तयार करण्याचा सल्ला दिला. ‘तुम्हाला कुणाला तरी कॅप्टन म्हणून तयार करायचं आहे. जसं महेंद्रसिंह धोनी कॅप्टन बनला. विकेट किपर हा नेहमीच चांगला विचार करू शकतो, कारण तो सर्व गोष्टींचं जवळून निरीक्षण करत असतो. पंतला भविष्यातील जबाबदारीसाठी तयार करावं. तो तरूण आहे, तसंच भविष्यात कॅप्टन होण्याची त्याची क्षमता आहे. विकेट किपर असल्यानं त्याचं डोकं आणि नजर हे मैदानात अधिक असते. त्यामुळे तो या भूमिकेसाठी सर्वाधिक लायक आहे. त्याला ही जबाबदारी द्या आणि एक वर्ष कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका. मला खात्री आहे, पंत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवेल.’ असं युवराज म्हणाला.
ऋषभ पंत परिपक्व नसल्याचा आक्षेपही युवराजनं यावेळी फेटाळून लावला. 2007 मधील टी20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या युवराजनं या आक्षेपाला उत्तर देताना सांगितलं की, ‘विराटला कॅप्टनसी मिळाली तेव्हा तो परिपक्व नव्हता. पंतही काळानुसार परिपक्व होत आहे. लोकं काय विचार करतात हे मला माहिती नाही, पण माझ्या मते पंत हा सर्वोत्तम पर्याय आहे.’ पंतशी बोलताना आपण नेहमीच ऑस्ट्रेलियन विकेट किपर अॅडम गिलख्रिस्टचं उदाहरण देतो. ‘गिलख्रिस्टच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सातव्या नंबरवर बॅटींग करत 17 शतक आहेत. पंतची आत्ताच चार शतकं असून त्याच्यात जगातील सर्वश्रेष्ठ विकेट किपर - बॅटर होण्याची क्षमता आहे,’ याची त्याला आठवण करून देतो असं युवराजनं सांगितलं. ऑस्ट्रेलियाला पहिल्याच मॅचमध्ये हरवणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, असंही युवराज या मुलाखतीमध्ये म्हणाला. IPL 2022 : ‘पर्पल कॅप चहलनं जिंकावी’, कुलदीपनं सांगितलेलं कारण वाचून वाटेल अभिमान युवराजनं ‘होम ऑफ हिरोज’ (Home of Heroes) या स्पोर्ट्स 18 वरील विशेष कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दिली आहे. ‘होम ऑफ हिरोज’ मध्ये भारतीय पुरूष आणि महिला क्रीडापटूंच्या खास मुलाखती पाहाता येणार आहेत. यामध्ये भारतीय दिग्गज त्यांचा आजवरचा प्रवास, खेळातील महत्त्वाच्या विषयांवर त्यांची मत फॅन्सशी शेअर करणार आहेत. युवराज सिंहनं ‘होम ऑफ हिरोज’ अंतर्गत दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग शुक्रवार (29 एप्रिल 2022) रोजी संध्याकाळी 7 वाजता फक्त Sports18 या वाहिनीवर दाखवला जाणार आहे.