मुंबई, 9 जून : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं वेस्ट इंडिज विरूद्ध झालेल्या पहिल्या वन-डे मध्ये शतक झळकावलं. या शतकासह कॅप्टन म्हणून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्यानं केला आहे. बाबरनं या शतकी खेळीसह पाकिस्तानला फक्त मॅच जिंकून दिली नाही तर क्रिकेट फॅन्सचं मनही जिंकलं. बाबरची शतकी खेळीमुळे ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारासाठी निवड झाली होती. पण, बाबरनं हा पुरस्कार टीममधील ज्युनिअर खेळाडू खुशदील शाहला दिला. बाबरला हा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी त्यानं हा पुरस्कार खुशदीलला देऊन टाकला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
बाबरनं खुशदीलला प्लेयर ऑफ द मॅच देण्याचं कारणही तितकंच ठोस आहे. पाकिस्तानला ही मॅच जिंकण्यासाठी 306 रनचं टार्गेट देण्यात आलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 45 ओव्हरमध्ये 4 आऊट 256 रन केले होते. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 48 रनची आवश्यकता होती. बाबर आणि रिझवान हे त्यांचे प्रमुख खेळाडू आऊट झाले होते. त्यावेळी खुशदीलनं 23 बॉलमध्ये नाबाद 41 रनची खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्यानं या खेळीत 1 फोर आणि 4 सिक्स लगावले. Ranji Trophy: आपल्या मुंबईचा वर्ल्ड रेकॉर्ड, 93 वर्षांनी रचला कुणालाही न जमलेला इतिहास बाबरनं मुलतानमध्ये झालेल्या या मॅचमध्ये शतक पूर्ण करताच वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. बाबरचं हे सलग तिसऱ्या वन-डेमध्ये शतक आहे. यापूर्वी त्यानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन वन-डेमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानं यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्ध 2016 साली शतकांची हॅट्ट्रिक केली होती.