मोहाली, 4 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिली टेस्ट मोहालीमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. या टेस्टमध्ये टीम इंडिया 3 स्पिनर्स आणि 2 फास्ट बॉलर्ससह उतरली आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून ही पहिलीच टेस्ट आहे. या टेस्टमध्ये त्याने मयंक अग्रवालसोबत भारतीय टीमची सुरूवात केली. या दोघांनी सुरूवातीलाच फटकेबाजी करत आक्रमक सुरूवात केली. रोहितला यावेळी मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 29 रन काढून आऊट झाला. लाहिरू कुमारानं त्याला आऊट केलं. रोहितनंतर मयंकलाही चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आले. मयंक 33 रन काढून आऊट झाला.
मयंक आऊट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) बॅटींग करण्यासाठी मैदानात आला. विराटची ही 100 वी टेस्ट आहे. त्यामुळे फॅन्सचं सध्या विराटकडं सर्वात जास्त लक्ष आहे. फॅन्सनी टाळ्यांच्या गजरात विराटचं स्वागत केल. विराटनं बॅटींगला आल्यानंतर पहिल्याच बॉलवर फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकवला. एमबुलडेनियाचा बॉल लेग साईडला विराटनं टोलावला, पण तो बॉल काही काळ हवेत होता. पहिल्याच बॉलवर विराटनं या प्रकारचा शॉट खेळल्यानं फॅन्सनी आश्चर्य व्यक्त केलं. ऐतिहासिक टेस्ट सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, दिग्गज क्रिकेटपटूचं निधन विराटनं 100 टेस्टच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये 50.39 च्या सरासरीनं 7962 रन केले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटनं नोव्हेंबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. या टेस्टमध्ये ही प्रतीक्षा संपवण्याचा विराटचा प्रयत्न असेल. पहिल्या बॉलवर काळजाचा ठोका चुकवल्यानंतर विराटनं लंचपर्यंत सावध बॅटींग केली. टीम इंडियानं लंचपर्यंत 2 आऊट 109 रन केले. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा हनुमा विहारी (30) आणि विराट कोहली (15) रन काढून खेळत होते.