मुंबई, 20 नोव्हेंबर: रोहित शर्मानं (Rohit Sharma) पूर्णवेळ टी20 कॅप्टन म्हणून जोरदार सुरूवात केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या दोन्ही मॅच एकतर्फी जिंकत टीम इंडियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता कोलकातामध्ये होणारी तिसरी आणि शेवटची मॅच जिंकत न्यूझीलंडला ‘क्लीन स्वीप’ देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यापूर्वी मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेली 5 टी20 सामन्यांची मालिका टीम इंडियानं 5-0 नं जिंकली होती. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर ही मॅच होत आहे. हे रोहित शर्माचं आवडतं मैदान आहे. याच मैदानात रोहितनं वन-डे क्रिकेटमध्ये 264 रनची ऐतिहासिक खेळी केली होती. आता कॅप्टन म्हणून न्यूझीलंडला 3-0 असं हरवण्याची मोठी संधी रोहितला आहे. शेवटच्या मॅचमध्ये टीम इंडिया नव्या खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. सहावा बॉलर म्हणून टीम इंडियात निवड झालेल्या व्यंकटेश अय्यरला कोलकातामध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाड, आवेश खान, इशान किशन यापैकी कुणाला शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळते याकडं क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. काय होणार बदल? आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारा ऋतुराज गायकवाड टॉप 3 मध्ये कोणत्याही क्रमांकावर बॅटींग करू शकतो. ऋतुराजला खेळवण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा किंवा व्हाईस कॅप्टन केएल राहुल यांना बाहेर बसावं लागेल. आगामी टेस्ट सीरिजचा विचार करून टीम इंडिया केएल राहुलला विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दीपक चहर किंवा भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला संधी मिळू शकते. आर. अश्विन किंवा अक्षर पटेलच्या जागी युजवेंद्र चहल आणि ऋषभ पंतच्या जागी इशान किशनचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. या मालिकेत आर. अश्विनचा फॉर्म ही टीम इंडियासाठी मोठी उपलब्धी ठरला आहे. अश्विननं अचूक बॉलिंग करत दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाला निर्णायक क्षणी विकेट मिळवून दिल्या. तसंच न्यूझीलंडच्या बॅटर्सना जखडून ठेवलं. 15 ते 20 ओव्हर्समध्येही न्यूझीलंडची टीम वेगानं रन करू शकलेली नाही. ही समस्या सोडवण्याचं आव्हान त्यांचा कॅप्टन टीम साऊदीसमोर असेल. T10 League: मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरनं रचला इतिहास,12 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल न्यूझीलंड: टीम साऊदी (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, रचिन रविंद्र, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, मार्क चॅपमन, आणि इश सोधी