मुंबई, 10 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नचे (Shane Warne) 4 मार्च रोजी निधन झाले. वॉर्नच्या निधनाचा क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला. अनेक क्रिकेटपटूंनी तशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर इयान हिली (Ian Healy) याला अपवाद आहे. वॉर्नच्या अकाली मृत्यूचा धक्का बसला नाही, असं मत हिलीनं एका टीव्ही कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. शेन वॉर्न इयान हिलीचा जवळचा मित्र होता. या मित्राबद्दल बोलताना हिलीनं सांगितलं की, ‘वॉर्नच्या अकाली मृत्यूचा मला धक्का बसला नाही. त्यानं कधीही शरीराकडं लक्ष दिलं नाही. तो कधीही सनस्क्रीन लावत नसे. त्याला त्वचा रोग होईल अशी भीती मला वाटत असते. पण, 52 वर्षापर्यंत त्याला काही झाली नाही. हार्ट अटॅक एकदम येत नाही. तुमचं शरीर हळू-हळू त्या दिशेनं जातं, असं हिलीनं सांगितलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी डॉक्टर पीटर बकनर यांनीही ‘फॉक्स स्पोर्ट्स’ शी बोलताना याच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. बकनर म्हणाले की, ‘वॉर्नला थायलंडमध्ये एकदम हार्ट अटॅक आला नाही. तो मागील 20-30 वर्षांपासून हळू-हळू त्या दिशेनं जात होता. खराब डाएट, धूम्रपान हे याचं मुख्य कारण आहे.’ Women’s World Cup : न्यूझीलंडविरूद्ध फक्त 1 विकेट घेऊनही झुलन गोस्वामीनं रचला इतिहास शेन वॉर्नवर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Shane Warne Funeral) केले जाणार आहेत. अंत्यसंस्कारावेळी जवळपास एक लाख लोक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉर्नने याच मैदानात 1994 साली इंग्लंडविरुद्ध ऍशेसमध्ये हॅट्रिक घेतली होती. वॉर्नच्या अंत्यसंस्कारानंतर सार्वजनिक शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.