मुंबई, 13 फेब्रुवारी: स्वमालकीचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक जण काटेकोर आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि परिश्रम करत असतो. घर खरेदी हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय असतो. आजच्या काळात बॅंक लोन (Home Loan) हा घर खरेदीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो; पण जेव्हा प्रत्यक्ष घर खरेदीची वेळ येते, तेव्हा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात डाउन पेमेंट (Down Payment) करणं आवश्यक असतं. ही घर खरेदीची सुरुवातीची आणि महत्त्वाची प्रक्रिया असते. परंतु, काही वेळा डाउन पेमेंटसाठी पुरेशी रक्कम जवळ नसल्यास अडचण निर्माण होऊ शकते. कमी वेळात ही रक्कम उभी करणं तसं अवघड असतं. अशा वेळी आपण पर्याय शोधू लागतो; मात्र काही सोप्या गोष्टी केल्यास डाउन पेमेंटसाठी पुरेशी रक्कम जमा करणं फारसं अवघड नाही. यासाठी काही बॅंक लोनचेही पर्याय उपलब्ध आहेत. घर खरेदी करताना अधिक प्रमाणात डाउन पेमेंट करण्याचे अनेक फायदे आहेत. याद्वारे तुम्ही बॅंकेसोबत व्याज दराबाबत (Home Loan Interest Rate) तडजोड करू शकता. डाउन पेमेंटची रक्कम जितकी जास्त तितकी कर्जाची रक्कम कमी होते. त्यामुळे तुम्हाला व्याजही कमी भरावं लागतं. हे वाचा- Multibagger Stock: एक लाख बनले 82 लाख, ‘या’ स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल खरं तर, कोणतीही बॅंक किंवा वित्तीय संस्था घर खरेदीच्या संपूर्ण खर्चासाठी 100 टक्के कर्ज देत नाही. साधारणपणे, तुम्हाला सेल अॅग्रीमेंट व्हॅल्यूच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकतं. डाउन पेमेंटसाठी उर्वरित रकमेची तजवीज तुम्हाला करावी लागते. यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेला मालमत्ता खरेदीतलं त्याचं स्वारस्य निश्चित करण्यास मदत होते. सामान्यतः डाउन पेमेंट हे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या सुमारे 5 टक्के ते 20 टक्के असतं आणि इतक्या मोठ्या रकमेची अल्पावधीत व्यवस्था करणं अनेकांसाठी थोडं कठीण असतं. डाउन पेमेंटसह घर खरेदीसाठीच्या अन्य खर्चासाठी रकमेची तजवीज काही अन्य मार्गांनी करता येते. डाउन पेमेंटसाठीच्या रकमेची तजवीज तुम्ही गोल्ड लोनच्या (Gold Loan) माध्यमातून करू शकता. या रकमेसाठी कुटुंबातल्या व्यक्ती किंवा मित्रांची मदतदेखील घेता येते. यासाठी पर्सनल लोन हादेखील एक पर्याय असला तरी तो काहीसा न परवडणारा असतो. कारण त्याचा व्याज दर जास्त असतो. हे वाचा- रेल्वे तिकीट ऑनलाईन बूक करताना Travel Insurance घ्या, अनेक फायदे मिळतात डाउन पेमेंटसाठी तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (Life Insurance Policy) किंवा प्रॉव्हिडंट फंडावरही (Provident Fund) लोन घेऊ शकता. याद्वारे सहज लोन मिळू शकतं आणि त्यावर व्याजही कमी द्यावं लागतं. विशेष म्हणजे या कर्जाच्या परतफेडीकरिता कोणताही ठराविक कालावधी नसतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता. यामुळे डाउन पेमेंटचं ओझं काही प्रमाणात कमी होऊ शकतं. तुम्ही महागडी प्रॉपर्टी खरेदी करत असाल, तर त्यासाठी डाउन पेमेंटही जास्त द्यावं लागतं. यासाठी अल्पकालीन अर्थात शॉर्ट टर्म गुंतवणूक (Short Term Investment) उपयोगी ठरते. यासाठी इक्विटीसारखी गुंतवणूकही उपयुक्त ठरते. कारण त्यातून केव्हाही पैसे काढता येतात. परंतु, तुम्ही सुरुवातीपासूनच खर्चावर नियंत्रण ठेवून बचत केली तर ते अधिक फायदेशीर ठरतं. हे वाचा- कामात गडबड केल्यास नोकरीवर गदा, ‘या’ कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका तुमचं आर्थिक नियोजन काटेकोर असेल, तर तुम्ही अनसिक्युअर्ड लोनचाही (Unsecured loan) विचार करू शकता. अनसिक्युअर्ड लोन घेण्यासाठी कोणतंही कोलॅटरल किंवा जामीनदाराची गरज नसते. परंतु, याचा व्याज दर तुलनेनं जास्त असतो. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही अगदी सहज मिळणारं पर्सनल लोनही (Personal Loan) घेऊ शकता. परंतु, तुम्ही तुमच्या परतफेडीच्या क्षमतेचं मूल्यांकन केल्यानंतरच अनसिक्युअर्ड लोन घेण्याचा विचार करावा.