या तिन्ही अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र एकूणच या घटनेने पिंपरी-चिंचवडच्या व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड, 14 सप्टेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) गुंडाराज आला की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण, अल्पवयीन पोरं सुद्धा दुकानदारांकडून हफ्ते वसुली करत असल्याचे समोर आले आहे. एका दुकानदाराने हफ्ता दिला नाही म्हणून मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या डीलक्स चौकात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हप्ता मागण्यांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार करून दुकानात मोठी तोडफोड केली आहे.
डिलक्स चौकातील मिस्टर मॅड या दुकानात ही घटना घडली आहे. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. दुकानात तोडफोड करणारी मुलं हे पिंपरी भागातीलच स्थानिक रहिवासी असून त्यांनीही दुकान मालकाकडे हप्ता मागण्यासाठी कोयत्याने वार केले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता दुकान मालक इब्राहीम सलीम शेखच्या तक्रारीवरुन पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन आरोपी मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र एकूणच या घटनेने पिंपरी-चिंचवडच्या व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.