राहुल कलाटेंनी सांगितलं उमेदवारी कायम ठेवण्याचं कारण
पुणे, 10 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. राहुल कलाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्तिगत फोन केले. मात्र, कलाटेंनी या दोन्ही नेत्यांची विनंती नाकारत अपक्ष लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयाच्या घोषणेनंतर राहुल कलाटे यांनी त्यांची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. काय म्हणाले बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे? “चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि विविध पक्षातील काही नेत्यांनी मला माघार घेण्याबाबत विचारले त्यांच्याविषयी मी आदर व्यक्त करतो. परंतु, चिंचवडच्या जनतेला ही कुस्ती कधीच आवडली नसती. त्यामुळेच चिंचवडच्या जनतेतून मला प्रचंड मोठ्या प्रमाणात रेटा होता की, मी लढलं पाहिजे. पिंपरी चिंचवडच्या 1 लाख 12 हजार जनतेने शेवटचं मत राहुल कलाटेला दिलं होतं. त्यावेळी संपूर्ण देशात भाजपची लाट होती. दिवंगत आमदारांचा या भागातील लोकांवर प्रचंड दबाव होता. महापालिका, राज्य आणि देशातही भाजपची सत्ता होती. असं असताना इतक्या लोकांनी मला मतदान केलं. याच लोकांचा आज मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह होता,” असं राहुल कलाटे यांनी सांगितलं. वाचा - ‘चौकशी करा पण..’ भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा एकनाथ खडसेंना मोठा दिलासा चिंचवडमध्ये तिरंगी लढत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. पण राहुल कलाटे हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. आज शिवसेनेच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांची मनधरणी केली. त्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर त्याचबरोबर सुभाष देसाई हे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेले होते. शिवसेनेच्या नेत्यांनी कलाटे यांची भेट घेऊन समजूत काढली. पण, कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही. कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, या तिरंगी लढतीमुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवारास होऊ शकतो असं मत राजकीय विश्लेषकाकडून व्यक्त केला जातंय.