JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्याच्या ब्रॅंडनं केली कमाल! देशी गायींच्या दुधाच्या नव्या ब्रँडचं उत्पन्न कोरोनाकाळात दुप्पट

पुण्याच्या ब्रॅंडनं केली कमाल! देशी गायींच्या दुधाच्या नव्या ब्रँडचं उत्पन्न कोरोनाकाळात दुप्पट

देशी गायीच्या दुधाबद्दलची जागरूकता कोरोनाआधीच्या काही वर्षांपासूनच लोकांमध्ये वाढीला लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 27 जुलै: दूध (Milk) हा जीवनावश्यक आणि शरीराच्या पोषणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक घटक आहे. म्हशीच्या किंवा जर्सी/संकरित गायींच्या दुधापेक्षा देशी गायींचं दूध अत्यंत पौष्टिक असतं. देशी गायीच्या दुधाबद्दलची जागरूकता कोरोनाआधीच्या काही वर्षांपासूनच लोकांमध्ये वाढीला लागली आहे. त्यात कोरोना कालखंडात तर पोषणाचं महत्त्व लोकांना अधिक प्रकर्षाने जाणवलं. याच कोरोना कालखंडात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दुग्धोत्पादन पद्धतीमुळे Mr Milk हा दुधाचा नवा ब्रँड पुणे-मुंबई परिसरात उदयाला आला आणि तो लोकप्रियही झाला. त्याचं उत्पन्न कोरोना काळात दुप्पट झालं आहे. मित्तल हॅपी काऊ डेअरी फार्म्समधून (Mittal Happy Cow Dairy Farms) या दुधाचं उत्पादन घेतलं जातं. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. देशी गायींचं दूध A2 दूध (A2 Milk) म्हणून ओळखलं जातं. ते अत्यंत पौष्टिक आणि चांगल्या गुणधर्मांनी युक्त असतं; मात्र देशी गायी (Desi Cow) दिवसाला केवळ सहा ते सात लिटरच दूध देतात. जर्सी किंवा संकरित गायी (Hybrid Cows) दिवसाला 25 ते 30 लिटर दूध देतात. त्यामुळे देशी गायी पाळण्याचं प्रमाण कमी होत आहे. देशी गोवंश टिकवणं हे मोठं आव्हान बनलं आहे. या पार्श्वभूमीवर मित्तल फार्म्सने लोणावळ्याजवळच्या आपल्या 85 एकरवर पसरलेल्या क्षेत्रावर 400 देशी गायी पाळून Mr Milk हा नवा ब्रँड मे 2019मध्ये मुंबई-पुण्याच्या बाजारपेठेत उपलब्ध केला. रिअल इस्टेट क्षेत्रात असलेल्या मित्तल ग्रुपचा हा उपक्रम आहे. मित्तल फार्म्सचं वैशिष्ट्य असं, की तिथे गायींना बांधून ठेवलं जात नाही. त्या खुल्या कुरणात मुक्तपणे संचार करत असतात. त्यांना झोपण्यासाठी मऊ गाद्या आहेत. त्यांना उच्च दर्जाचं खाद्य दिलं जातं आणि दिवसाच्या शेवटी खास स्पा ट्रीटमेंटही त्यांना दिली जाते. त्यामुळे हॅपी काऊज डेअरी फार्म या नावाप्रमाणेच तिथल्या गायी खरंच अत्यंत आनंदात असतात. हे वाचा - आसाम-मिझोराम हिंसाचारात इंदापूरचा सुपूत्र जखमी; खा. सुळे Tweet करत म्हणाल्या.. कंपनीचे संचालक नीरज मित्तल (Neeraj Mittal) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या फार्मवरच्या गायींची संख्या 1000पर्यंत वाढवली जाणार आहे. सध्या तिथलं रोजचं दुग्धोत्पादन 1500 ते 1800 लिटर एवढं आहे. कंपनीने पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली असून, दूध काढण्यापासून पॅकिंगपर्यंत कोणत्याही टप्प्यात दुधाला मानवी स्पर्श होत नाही. हे दूध पर्यावरणपूरक पेपर कार्टनमध्ये पॅक केलं जातं. तसंच, ग्राहकांच्या दारापर्यंत दूध पोहोचवण्याची व्यवस्था कंपनीने स्वतःच्याच नेटवर्कमधून उभी केली आहे. फक्त या फार्ममध्ये उत्पादित झालेलं दूधच या ब्रँडअंतर्गत विकलं जातं आमचा फार्म अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरक ठरावा, अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. इच्छुकांना फार्मला भेटी देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. महामारीच्या काळात नागरिक पौष्टिक दुधाचे स्रोत शोधत होते. त्यात त्यांना आमचा ब्रँड चांगला वाटला आणि त्यांनी आम्हाला पसंती दिली, असंही मित्तल यांनी सांगितलं. 2019-20मध्ये त्यांची उलाढाल 1.8 कोटी रुपयांची होती. 2020-21मध्ये ती दुप्पट झाली आहे, यावरून लोकांकडून या ब्रँडला पसंती मिळत असल्याचं दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या