अहमदनगर, 6 मे: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण (Vaccination) ठप्प झाले होते. जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी लसीकरण सुरू झाले. मात्र लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला. कोपरगावमध्ये लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी डाॅक्टर आणि नर्सला धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर ‘आम्हाला सुरक्षा मिळाली तरच लसीकरण सुरू ठेवणार’ असल्याचा इशारा आरोग्य सेवकांनी दिला आहे. काय घडला प्रकार? कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना प्रथम लस देण्यात येणार होती. त्याचवेळी 45 वर्षांच्या वरील नागरिकांनीही दुसरा डोस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. केवळ 300 जणांना आज लस देण्यात येणार असल्याने नागरिकांनी पहाटे पासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. ही गर्दी नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांनाही धक्काबुक्की झाल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सचिन जोशी यांनी दिली आहे. कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह सासरच्यांनी नाकारला; माहेरच्या सरपंचामुळे गावच्या लेकीवर झाले अत्यंसंस्कार पहाटे 4 पासून रांगा ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनीच सकाळी 8 वाजता टोकन घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतरही ऑनलाईन नोंदणी न केलेल्या नागरिकांनी टोकन साठी नंबर लावल्यानं नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पहाटे 4 वाजल्यापासून नागरिकांनी नंबर लावण्यास सुरुवात केली होती. अखेर या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिंसाची मदत रुग्णालय प्रशासनाला घ्यावी लागली.