मनात धाकधूक धाकधूक आणि असंख्य स्वप्न होती. आनंद खूप होता पण भीतीही तितकीच होती. वऱ्हाडासह नवरा मुलगा आपल्या नवरीला घेऊन जायला मंडपात थाटात उभा होता. परंतु नवरी काय, नवरीच्या गळ्यात मंगळसूत्रही न घालता त्याला नाराज होऊन आपलं वऱ्हाड घेऊन माघारी परतावं लागलं. सोमवारी रात्री उशिरा झारखंड राज्यातील गिरिडीह जिह्यात त्याचं विधिवत लग्न पार पडणार होतं. मात्र झालं असं की...
बादीडीह गावचे रहिवासी विरेंद्र साव यांनी आपला मुलगा त्रिलोक कुमार याच्यासाठी मालडा गावात राहणारी लाखात एक मुलगी निवडली होती. पद्धतशीर बोलणी पार पडली आणि दोन्ही कुटुंबीयांनी बादीडीहच्या बगलासोत शिव मंदिरात हा विवाहसोहळा पार पाडायचं ठरवलं. लग्नाआधीचे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडले. मात्र जो काय विघ्न यायचा होता तो नेमका लग्नाच्याच दिवशी आला.
सोमवारी रात्री उशिरा वधू पक्षातील मंडळी लग्नाची आणि वर पक्षाच्या स्वागताची तयारी करत होते. तितक्यात नवरा वरात घेऊन मंदिराच्या दारात हजर झाला. नवरीकडच्या मंडळींनी त्याचं आणि वरतीचं आनंदाने स्वागत केलं. थोड्याच वेळात मुहूर्तावर लग्नाच्या विधीही सुरू झाल्या. लेहेंग्यात सजलेली सुंदर नवरी घुंगटच्या आत खुशच असणार असं सर्वांना वाटत होतं. परंतु 'आता वधू-वर दोघांनी एकमेकांना हार घाला', असं पंडितजी म्हणाले आणि नवरीने 5 मिनिटं मागितली. 'मी जरा येते', असं म्हणून ती बाजूला गेली.
नवरी अशी एकटीच बाजूला गेली, हे पाहून लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. बराच वेळ झाला नवरी काही येईना. मग शेवटी तिला बोलवायला जावं लागलं. परंतु सगळीकडे पाहिलं तरी ती कुठे दिसलीच नाही. मग नवरी गायब झाली, अशी मंडपात बोंबाबोंब झाली. त्यावेळी तिथे काहीजण आले आणि सांगितलं, इथून 300 मीटर अंतरावर एक मुलगा बाईक घेऊन उभा होता, कोणाचीतरी वाट बघत होता. त्याच्या हातात 2 हेल्मेट होते आणि तो गावातला दिसत नव्हता. काही वेळाने तिथे नवरी आली तिने रस्त्यातच लेहेंगा काढला. आता जीन्स घातली होती, त्याच्या हातातला हेल्मेट घालून दोघंही पसार झाले. हे ऐकताच दोन्ही पक्षातील लोकांना मोठा धक्का बसला.
याप्रकरणी नवरीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून आपल्या मुलीचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली आहे. दरम्यान, या लग्नाबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नवरीच्या कुटुंबियांना तर कुठे तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. तर, नवरी पळून गेल्यावर नवऱ्यालाही आपल्या कुटुंबियांसह अत्यंत शरमेने मंडपातून माघारी परतावं लागलं.