अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबान युगाला सुरुवात होत आहे. कमी काळातच तालिबाननं पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तालिबानला पैसे कोण पुरवतं, तालिबानची कमाई किती आहे, तालिबानला शस्त्रं कुठून मिळतात, यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2011 च्या रिपोर्टनुसार तालिबानचा वार्षिक महसूल 300 मिलियन डॉलर होता. सध्या तालिबानची वार्षिक कमाई भारतीय चलनानुसार 1 अब्ज 11 कोटी 32 लाख 55 हजार रुपये असल्याची माहिती आहे.
तालिबान अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याची माहिती आहे. ज्या भागात त्यांची सत्ता असते, तिथं ते भरमसाठ कर लावतात. केवळ अंमली पदार्थांच्या तस्करीतून त्यांना 300 मिलियन डॉलर मिळत असल्याचं सांगितलं जातं.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाण उद्योगातून तालिबाननं 464 मिलियन डॉलरची कमाई केली. या उत्पन्नामुळे तालिबानला शस्त्रास्त्रं आणि इतर सामुग्रीसाठी पैसा कमी पडत नाही
तालिबानला मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. अनेक श्रीमंत देश तालिबानला छुपी मदत करत असल्याचं सांगितलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघाकडून अशा देणग्यांना ‘नॉन गव्हर्नमेंटल चॅरिटेबल फाऊंडेशन नेटवर्क’ असं म्हटलं जातं.
पाकिस्तान आणि इराणकडून तालिबानला पैसा मिळत असल्याचा दावाही केला जातो. मात्र त्यासाठी कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही.
वर्ल्ड बँकेच्या आकड्यांनुसार 2018 साली अफगाणिस्तान सरकारने 11 अब्ज डॉलर खर्च केले, ज्यातील 80 टक्के भाग हा परदेशातून आलेला होता. मात्र तालिबान यापेक्षाही अधिक कमाई करत असल्याचं दिसून येत आहे.