अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर इथं गृहयुद्धाची परिस्थिती तयार झाली आहे.
अफगाणी सैन्यानं गेल्या 24 तासात 300 तालिबांनींचा खात्मा केला आहे. नंगरहार, लगमन, गजनी, पक्तिका, कंधार, जाबुल, हेरात, जोज्जान, समांगन, फरयाब, सर-ए पोल, हेलमंद, निमरूज, कुंदुज, बगलान आणि कपिसा या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण 303 तालिबानी मारले गेले आहेत, तर 125 पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत.
नुकताच तालिबाननं अफगाणिस्तानचे हंगामी संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांना ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यातून मोहम्मदी थोडक्यात बचावले.
सुमारे 5 तास चाललेल्या कारवाईत 4 हल्लेखोरांनाही ठार करण्यात आलं. तर एका बस हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जखमी आहेत.
अफगाणिस्तानमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत संयुक्त राष्ट्र संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर सत्तेसाठी तालिबान मानवाधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं युएननं म्हटलं आहे.