पाकिस्तानची युवा महिला क्रिकेटर आयशा नसीम हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. तिने याबाबतचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवला आहे.
आयशा नसीमने २०२० मध्ये टी२० वर्ल्ड कपमधून पदार्पण केलं होतं. थायलंडविरुद्धच्या सामन्यात तिला खेळण्याची संधी मिळाली होती. आतापर्यंत आयशाने पाकिस्तानसाठी ३० टी२० सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळले. आयशाने ३० टी२० सामन्यात १२८.१२ च्या स्ट्राइक रेटने ३६९ धावा केल्या आहेत. तर ४ एकदिवसीय सामन्यात तिला ३० धावाच करता आल्या.
आयशा नसीम ही तिच्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखली जात होती. तिने ३० टी२० सामन्यात १८ षटकार आणि २० चौकार मारले होते. पाकिस्तानच्या महिला संघाकडून टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर निदा दार असून तिने १३० सामन्यात २७ षटकार मारले आहेत.
भारताविरुद्ध २०२३ च्या महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये ८१ मीटर लांब षटकार मारला होता. हा स्पर्धेतला सर्वात लांब षटकार होता. त्यानंतर आय़र्लंडविरुद्धही ७९ मीटर लांब षटकार मारला होता.
आयशाने पाकिस्तानकडून २०२० आणि २०२३ मध्ये दोनदा महिला टी२० वर्ल्ड कप खेळला. यामध्ये तिला केवळ तीनच सामने खेळण्याची संधी मिळाली. यात आयशाने ४९ धावा केल्या होत्या.
वयाच्या १५ व्या वर्षा पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या आयशाच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उर्वरित आयुष्य इस्लामनुसार जगायचे असल्याने निवृत्ती घेत आहे असं आयशाने म्हटलंय.