आयएएस अधिकारी टीना दाबी कायमच चर्चेत असतात, कधी त्यांच्या यशाबद्दल तर कधी वैयक्तिक आयुष्याबद्दल. आता जैसलमेरच्या कलेक्टर म्हणून काम करताना टीना दाबी यांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. यानंतर टीना दाबी ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आल्या आहेत.
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानहून आलेल्या हिंदू विस्थापितांची घरं जमीनदोस्त करण्यात आली. ही ऑर्डर आयएएस टीना दाबी यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. अमर सागर ग्राम पंचायतीमध्ये विस्थापित कच्च्या वस्तीमध्ये राहत होते. युआयटीने हे अतिक्रमण असल्याचं सांगत कारवाई केली. विस्थापित तलावाच्या किनारी अवैध घरं बांधून राहत होते, असा दावा प्रशासनाने केला आहे. या कारवाईमुळे अनेक महिला, मुलं आणि पुरुष बेघर झाली आहेत.
टीना दाबी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं, यानंतर 2015 साली त्यांनी युपीएससी टॉप केलं, 2018 साली टीना दाबी यांनी त्यांचेच बॅचमेट असेलल्या अतहर आमिर खानसोबत लग्न केलं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघं वेगळे झाले. टीना दाबी या सध्या जैसलमेरच्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत.
टीना दाबी यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचं आगमन झालं. 2021 साली टीना दाबी यांनी आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. प्रदीप गावंडे हे टीना दाबी पेक्षा 13 वर्ष मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या नात्यावरही बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. टीना दाबी यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत भाष्य केलं होतं.
टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांची भेट कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेवेळी झाल्याचं बोललं जातं. दोघंही राजस्थान आरोग्य विभागामध्ये एकत्र काम करत होते. एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.