शुक्रवारी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील तपोवन विधानसभा संकुलात सवर्ण आयोगाच्या मागणीवरून त्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला.
आता सरकारने या आंदोलकांची मागणी मान्य केली असून मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तीन महिन्यांत आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केली. सरकारने याबाबत लेखी अधिसूचनाही जारी केली आहे.
शुक्रवारी विधानसभेच्या तपोवन परिसरात आंदोलकांनी दगडफेक करत पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी विधानसभेचा घेराव घातला होता.
विधानसभेच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ 900 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अशी परिस्थिती असतानाही पोलिसांनी आंदोलकांना गोंधळ घालण्यापासून रोखण्यात हलगर्जीपणा दाखवल्याचं बोललं जात आहे.
आंदोलकांनी विधानसभेचा घेराव घातल्यानंतर झालेल्या दगडफेकीत डझनभर लोक जखमी झाले आहेत.
आंदोलन चिघळताच तपोवनातील टॉवर क्लॉकजवळ वाहनांच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली. अशा स्थितीत सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यंत तपोवन, सिद्धबारी या एरियात वाहतूक कोंडी झाली होती.
आंदोलन हाताबाहेर जात असल्याचं पाहताच यात वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
आंदोलकांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडत विधानसभेकडे चाल केली होती. त्यानंतर आता त्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे.
या आंदोलकांनी पिकअप वाहन जबरदस्तीने बॅरिकेड्समध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला. यात काही पोलिसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळं आता या आंदोलनानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यानंतर हे आंदोलन आंदोलन शांत झाले.