जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा अव्वल ठरले आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अप्रूव्हल रेटिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहेत.
सर्व्हेनुसार २२ नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ७८ टक्क्यांसह यादीत सर्वात वरच्या स्थानी आहेत. मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकन राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर यांना ६८ टक्के मिळाले तर तिसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडचे एलेन बेर्सेट यांना ६२ टक्के पसंती मिळाली.
दरम्यान सर्व्हेत असंही सांगण्यात आलं आहे की, भारतात जवळपास १८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं नाकारलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांना ४० टक्के रेटिंग मिळालं आहे. ते लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अनुक्रमे ७ व्या आणि ९ व्या क्रमांकावर आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ३० टक्के रेटिंग मिळाले. लोकप्रिय नेत्यांच्या यादीत ते १३ व्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेटिंग २ मे २०२० मध्ये ८४ टक्क्यांवर पोहोचलं होतं. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने २०२१ च्या मे महिन्यात हाहाकार माजवला होता तेव्हा मोदींची लोकप्रियता ६३ टक्क्यांवर पोहोचली होती.