पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावं विकासाच्या बाबतीत समृध्द करण्याच्या उद्देशाने 15 ऑगस्ट 2014 मध्ये सुरू केलेल्या 'आदर्श ग्राम संसद योजने'तून उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील अनेक गावांचा कायापालट झाला आहे. गावंच्या गावं दत्तक घेऊन पंतप्रधानांनी तेथील रहिवाशांना शहरासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याच योजनेचा लाभार्थी असलेल्या 'परमपूर' या गावाच्या विकासाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
अंगणवाडी, प्राथमिक शाळा, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व सुविधांयुक्त आरोग्य केंद्र, इत्यादी लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील अशा सर्व सुविधा या गावात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय गावातील सर्व वाटा गुळगुळीत झाल्या असून पक्के रस्ते बांधण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कोणताही अडथळा येऊ नये आणि रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचता यावं.
आता या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह इतर सर्व रस्त्यांवर मोठमोठ्या गाड्या धावताना दिसतात. तसेच काही रस्त्यांचे काम अद्याप बाकी आहे. गावातले सर्व रस्ते एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे.
गावातील दोन सरकारी शाळा अगदी नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या इमारती नव्याने बांधण्यात आल्या असून सजावटही अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे.
गावातील प्राथमिक शाळेचं चित्रही पूर्णतः बदललं आहे. शाळेभोवती हिरवीगार झाडं लावण्यात आली असून भिंतींवर आकर्षक चित्रही काढण्यात आली आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात अभ्यास करता येईल.
गावातील रहिवाशांना मोठ्या आजारांवरील उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज पडू नये यासाठी गावातील आरोग्य केंद्राचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. या केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांना मोफत चांगल्या दर्जाचे उपचार मिळत आहेत.
पूर्वी येथील लोकांना दूर-दूरहून हंडे भरून पाणी आणावं लागायचं. मात्र आता गावातच पिण्याच्या पाण्याची टाकी बसवण्यात आली असून तिची पाईपलाईन घरोघरी जोडण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना घरातच शुद्ध पाणी प्यायला मिळतं आहे.