राम जन्मभूमी अयोध्येत लवकरच रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, रामलल्लाची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळमधून दोन शिळा आणण्यात अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. मात्र या शिळांच्या धार्मिक मान्यता आणि राम भक्तांच्या आस्थेमुळे आता नवाच वाद सुरू झाला आहे.
जनकपूरच्या जानकी मंदिराचे महंत आणि नेपाळचे उपपंतप्रधान यांच्या उपस्थितीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडे शाळीग्राम शिळा सोपवण्यात आल्या. मात्र या दगडाच्या धार्मिक मान्यतेवरून आता वाद सुरू आहे.
अयोध्येत आणलेल्या शाळीग्राम शिळा नेपाळच्या गंडकी नदी किनारी आढळतात. असं मानलं जातं की या शिळा जवळपास ६ हजार कोटी वर्षे जुन्या आहेत.
शाळीग्राम शिळांबाबत अशी मान्यता आहे की, यामध्ये विष्णूचा वास असतो. नारायण रुपात याची पूजाही केली जाते. तसंच यामध्ये विष्णूसह माता लक्ष्मी असल्याचंही मानलं जातं.
विष्णू आणि माता लक्ष्मीचं रूप असल्यानं शाळीग्राम शिळेची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. थेट स्थापना करत पूजा करण्यात येते.
नेपाळमधून अयोध्येत दोन शिळा आणण्यात आल्या आहेत. मोठ्या शिळेतून प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार करण्यात येणार अस्लयाचं म्हटलं जातंय. त्यामुळे या शिळेची भक्तांकडून राम लल्ला म्हणून पुजाही केली जात आहे.
लहान शिळाही आणण्यात आली असून त्यातून माता जानकी किंवा प्रभू लक्ष्मण यांच्या मूर्ती तयार केल्या जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.
अयोध्येतील सर्वात प्राचीन पीठ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगदगुरू परमहंस आचार्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी मागणी केलीय की, जर शाळीग्राम शिळेवर छिन्नी-हातोडा चालवला तर मी अन्न आणि पाण्याचा त्याग करेन.
पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांचे म्हणणे आहे की, शाळीग्राम शिळा ही नारायणाचं स्वरुप आहे. त्यामुळे देवावर छिन्नी आणि हातोड्याने प्रहार स्वीकारार्ह नाही. असे झाले तर देशासह विदेशात भयंकर विध्वंस होईल.
अयोध्येत जेव्हापासून शाळीग्राम शिळा पोहोचल्या आहेत भाविकांनी पूजेसाठी गर्दी केली आहे. लाखो भक्त अयोध्येत पोहोचून प्रभू रामचंद्रांचेच स्वरूप मानत शाळीग्राम शिळेची पूजा करतायत.