राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे या साल 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन सलग तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झाल्या. अलिकडेच त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुराही सोपवण्यात आली.
वडील शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांच्यापोटी 30 जून 1969 रोजी सुप्रिया सुळेंचा पुण्यात जन्म झाला. वडिलांची राजकीय कारकीर्द पाहत पुण्यातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.
सुप्रिया सुळेंचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पूर्ण झालं. सूक्ष्मजीवशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादित केली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर 4 मार्च 1991 रोजी वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी सदानंद भालचंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. गेली 32 वर्ष त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.
त्यांना विजय आणि रेवती नामक दोन आपत्य आहेत. दोघांचंही मुंबईत शिक्षण सुरू आहे.
भारतातील एका प्रसिद्ध राजकारण्याची लेक असूनही सुप्रिया सुळेंनी सुरुवातीलाच राजकारण निवडलं नव्हतं. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून जल प्रदूषणावर अभ्यास केला. मग इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्यानंतर त्या मुंबईत परतल्या. 2006 साली त्या महाराष्ट्राकडून राज्यसभेवर लढल्या आणि विजयी झाल्या.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात मोहिमेचं नेतृत्त्व केलं. या मोहिमेअंतर्गत पदयात्रा काढण्यात आल्या, महाविद्यालयीन कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत नेहमीच आवाज उठवला आहे. स्त्री भ्रूणहत्येसह हुंडा प्रथेविरोधातही त्यांनी मोर्चे काढले आहेत. महिला सशक्तीकरणासाठी सततच्या प्रयत्नांबाबत ऑल लेडीज लीगने त्यांना प्रतिष्ठित 'मुंबई वुमन ऑफ द डिकेड' पुरस्काराने सन्मानित केलं आहे.