मुंबई, 11 मे : भारतात बहुतेक ठिकाणी कपडे धुण्याची सुविधा वॉशरमनकडून घेतली जाते. तो दारातून कपडे गोळा करतो, धुतो, इस्त्री करतो आणि ग्राहकाला परत करतो. वॉशरमन म्हणजेच धोबी हे काम पिढ्यानपिढ्या करतात. या कामातून ते तेवढेच पैसे कमवू शकतात जेणेकरून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. म्हणूनच कधी लॉन्ड्रीचे रूपांतर कोट्यवधींच्या व्यवसायात करता येईल, असा विचार करणे अशक्य आहे. पण हे काम आयआयटीयन अरुणाभ सिन्हा यांनी केले आहे.
अरुणाभचा जन्म जमशेदपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील शिक्षक आणि आई हाउस वाईफ होती. अरुणाभ सिन्हा आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बे मधून मेटलर्जी आणि मटेरियल सायन्समध्ये मास्टर्स केलेय. त्यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये दिल्लीमध्ये UClean सुरू केले आणि आज ती 100 हून अधिक शहरांमध्ये उपस्थिती असलेली भारतातील सर्वात मोठी लॉन्ड्रोमॅट साखळी आहे.
अरुणाभने 2008 मध्ये अमेरिकेतील एका कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करून करिअरला सुरुवात केली. हे ऑफिस पुण्यात होते आणि अरुणाभ तेथे एनालिटिकल एसोसिएट होता. यानंतर, 2011 मध्ये, त्यांनी बिजनेस कंसल्टिंग फर्म franglobalमध्ये प्रवेश केला. यानंतर 2015 मध्ये ते हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये रुजू झाले. त्यानंतर ट्रायबो हॉटेलमध्ये डायरेक्टर ऑफ नॉर्थ इंडिया म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अरुणाभ सिन्हा यांच्या लक्षात आले की, बहुतांश तक्रारी या लॉन्ड्रीबाबत होत्या.
लॉन्ड्रीशी संबंधित समस्यांबद्दल सुमारे 60 टक्के तक्रारी मिळाल्या. यानंतर अरुणाभने अधिक चांगली लॉन्ड्री सेवा प्रदान करणार्या कंपन्यांचा शोध सुरू केला. परंतु त्यावेळी त्यांना संपूर्ण भारतात अशी कोणतीही सुविधा मिळाली नाही. तेव्हा अरुणाभला कल्पना आली की आपण या क्षेत्रात आणखी चांगले करू शकतो. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली.
जानेवारी 2017 मध्ये दिल्ली-एनसीआरमधून UClean नावाने लॉन्ड्रीचे काम सुरू केले. 2017 च्या मध्यात फ्रँचायझी मॉडेलच्या माध्यमातून हा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला. 2017 च्या अखेरीस, UClean ने हैदराबाद आणि पुणे येथे फ्रँचायझींद्वारे काम सुरू केले. आता देशभरातील 104 शहरांमध्ये 350 हून अधिक स्टोअर्स आहेत. UClean बांगलादेश आणि नेपाळमध्येही आहे. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील इतर काही देशांमध्ये ते आहे.
कंपनी UClean स्टोअर्स उघडण्यासाठी छोट्या उद्योजकांसोबत भागीदारी करते. ते स्टोरवर काम कसं करायचं हे शिकवण्यासाठी ट्रेनिंगही देतात आणि एम्पलॉई देखील हायर करतात. UClean फ्रँचायझी फी आणि मासिक रॉयल्टीमधून कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कंपनी 100 कोटींचा व्यवसाय करत आहे.