आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. करदात्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर भरावा लागेल. कारण ही मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेय. अशा परिस्थितीत तुम्हीही नियमितपणे आयटीआर फाइल करत असाल तर हे काम 31 तारखेपूर्वी पूर्ण करा.
तुम्ही 31 जुलै 2023 नंतरही ITR दाखल करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. 31 डिसेंबर 2023 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण तुम्ही उशीर केला तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर कलम 234F नुसार तुम्हाला 5,000 रुपये लेट फिस भरावी लागेल. करदात्याचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असल्यास, लेट फिस 1,000 रुपयांपर्यंत मर्यादित असेल.
दुसरीकडे, तुम्ही 31 डिसेंबर 2023 नंतर ITR फाइल केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय 31 जुलैपर्यंत ITR न भरल्यास कलम 234A अंतर्गत रिटर्न भरेपर्यंत दरमहा 1% व्याज लागेल.
रिटर्न भरताना, लोकांनी आयटीआर भरताना चुकीची माहिती देऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. कारण कमी उत्पन्नाची तक्रार केल्यास 50 टक्के किंवा उत्पन्नाशी संबंधित चुकीची माहिती दिल्यास 200 टक्के दंड होऊ शकतो. लक्षात ठेवा की हा दंड एकूण टॅक्सेबल उत्पन्नावर लावला जाईल.
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतरही जर कोणी जाणूनबुजून रिटर्न भरण्यात अपयशी ठरले. तर आयकर विभाग अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये दंडासोबतच 3 महिने ते 2 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. जर आयकर विभागाची कराची रक्कम 25,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर शिक्षा 7 वर्षांपर्यंत वाढू शकते.