भारतात सोन्याचे आकर्षण अनेक शतकांपासून आहे. धार्मिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून सोनं या धातूला खूप महत्त्व दिलं जातं. याच कारणामुळे भारतीयांना सोनं खूप प्रिय आहे. परंतु किंमती वाढल्याने सोनं खरेदी करणं सोपं नाही. तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात सर्वाधिक सोने भारतात आहे.
एकेकाळी भारताला चोने की चिडिया म्हटले जायचे. पण मुघल आक्रमकांनी आणि इंग्रजांनी आपल्या देशाची खूप लूट केली आणि प्रचंड सोने हिसकावून घेतले. मात्र, आजही भारत सोने ठेवण्याच्या बाबतीत भारत 'सोने की चिडिया'च आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, भारतीय महिलांकडे सुमारे 21000 टन सोने आहे आणि त्याची किंमत सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 100 लाख कोटी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय महिलांकडे असलेले हे सोन्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, कारण जगातील टॉपच्या 5 बँकांकडेही इतका सोन्याचा साठा नाही.
2021-22 च्या वर्ल्ड गोल्ड रिझर्व्हच्या आकडेवारीनुसार, यूएस सेंट्रल बँकेकडे 8133.47 टन, जर्मनीकडे 3358.50 टन, रशियाकडे 2301.64 टन आणि चीनकडे 1948 टन सोन्याचा साठा आहे. त्याच वेळी, RBI कडे भारतात 760.40 टन सोन्याचा साठा आहे.
भारतात गुंतवणूक आणि परिधान या दोन्हीसाठी सोने खरेदी केले जाते. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा लोक त्यांच्या बचतीपैकी फक्त 5 टक्के रक्कम बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवतात आणि सोन्यामध्ये गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देतात. तामिळनाडूमध्ये बहुतेक लोक एकूण गुंतवणुकीच्या 28.3 टक्के गुंतवणूक सोन्यात करतात.
भारतीयांकडे असलेल्या एकूण सोन्यात दागिन्यांचा वाटा सुमारे 80 टक्के आहे. तेथे मंदिरांमध्ये अडीच हजार टन सोने आहे. यापैकी केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिरात 1300 टन सोने असल्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात 250 ते 300 टन सोने आहे. मंदिराने बँक डिपॉझिट स्किममध्ये 4.5 टन सोनं ठेवलं आहे. दर महिन्याला येथे 100 किलो सोने दान म्हणून येते.