भारतात सर्वसाधारण अर्थात सरासरीइतका पाऊस होणार आहे. मात्र जून महिन्यात मात्र पाऊस शेतकऱ्यांची निराशा करू शकतो. जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जिथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, ते वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस असेल. तर संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकतं.
जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून ही असते. यंदा तो उशिरा म्हणजे चार जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मान्सूनविषयक दोन दीर्घकालीन अंदाजांपैकी पहिला अंदाज अचूकतेच्या बाबतीत थोडा कमी असल्याचा इतिहास आहे.
दरम्यान, यंदा एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. तसंच, दुष्काळ पडण्याची शक्यता 60 टक्के असल्याचंही स्कायमेटने म्हटलं आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 94 टक्के पाऊस यंदा अपेक्षित असून, त्यात 5 टक्के कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.