नागपूरमध्ये मालगाडीचा विचित्र अपघात घडला आहे. रेल्वे फाटकात असलेली मालगाडी अचानक रिव्हर्स आल्यामुळे हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाड्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
बोखरा गोधनी रेल्वे फाटक उघडं असताना समोर गेलेली मालगाडी रिव्हर्स आली.
मालगाडी परत मागे आल्यामुळे हा अपघात झाला. कार चालकाला मालगाडी येत असल्याचं दिसलं, यानंतर त्याने खिडकीतून उडी मारली.
कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला, पण कारचं मात्र मोठं नुकसान झालं. खिडकीतून उडी मारल्यानंतर कार चालकाला थोडी दुखापत झाली.
मालगाडी रिव्हर्स आल्यामुळे कारच्या समोर असलेल्या बुलेट चालकालाही लागलं, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. या प्रकरणी कोराडी पोलीस स्टेशनमध्ये लोको पायलट आणि गेट कीपरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.