कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या ४० फुटांवर पाणी आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास धोका पातळीही ओलांडण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंचगंगा नदीच्या काठावरील नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले आहे. २०१९,२०२१ मध्ये ज्यांच्या घरी पुराचे पाणी आले होते त्यांनी तातडीने स्थलांतर करा असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय.
कोल्हापुरात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरग्रस्त भागातील 28 गावातील शाळांना उद्यापासून सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
शाळांचा वापर पूरग्रस्त छावण्यासाठी करण्यात येणार आहे. तसंच पाणी वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
पूरग्रस्त २८ गावातील शाळांना आजपासून सुट्टी देण्यात आली आहे. शाळांना देण्यात आलेली सुट्टी पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे असंही प्रशासनाने सांगितलं आहे.
संभाव्य पूरस्थिती साठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. महापुरामध्ये नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाणी शिरते, त्यामुळे इथले दस्ताऐवज हलवण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे
जिल्हाधिकारी कार्यालयातही मागील पुरावेळी पाणी आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरबाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आवाहन केले आहे.
राधानगरी धरण 94 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार आहेत त्यामुळे कोल्हापूरला पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले आहे.