महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून नृत्यांगना गौतमी पाटील हिची चर्चा वेगवेगळ्या कारणांनी होत आहे. सुरुवातीला नृत्य करताना अश्लील हावभाव केल्यानं वाद निर्माण झाला होता.
गौतमीने वादानंतर माफीही मागितली होती. दरम्यान, तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि वाद यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदीची मागणीही केली जात आहे.
आता गौतमी पाटीलला माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते खान्देश कन्या म्हणून गौरवण्यात आलं आहे. गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत.
जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खान्देश कन्या म्हणून गौतमीचा गौरव केला गेला.
गौतमीने म्हटलं की, आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव केला गेला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. असाच मायेचा हात माझ्या पाठीशी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. जय खान्देश
गौतमी पाटील ही मूळची धुळ्याची आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात तिचं गाव आहे. तिच्या नृत्य शैलीमुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर माफी मागूनही तिला ट्रोल केलं जात असल्यानं नाराजी व्यक्त करताना गौतमीने म्हटलं होतं की, मी सुधारले आहे. आता मला ट्रोल करू नका.